अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर शहर विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत माजी महापौर संदीप कोतकर हेच उमेदवार असल्याची घोषणा झाल्यानंतर संग्राम जगताप आणि संदीप कोतकर या दोन साडु- साडुंमध्ये लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे या संभाव्य लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. मात्र, तांत्रिक अडचणी असल्याने आपण निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी महापौर संदीप कोतकर यांनी नगर सह्याद्रीशी बोलताना दिली.
नगर शहर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी अंतिम करण्यात आली असताना त्यांच्या विरोधात माजी महापौर संदीप कोतकर यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार त्यांचे सचिन कोतकर यांनी नगर शहरासह उपनगरात बैठकांचा सपाटा लावला होता. गणेशोत्सवात या अनुषंगाने मोठे शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आले. कार्यकर्त्यांचा मोठा संच सोबत असल्याने कोतकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. निवडणुकीसाठी त्यांन उच्च न्यायालयाने जिल्हा बंदीची अट देखील शिथील केली होती.
संदीप कोतकर यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे नगर शहरात उत्सुकता शिगेला पोहचली होती. संदीप कोतकर आणि संग्राम जगताप हे दोघेही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे जावई! दोन साडु एकमेकांच्या समोर येेणार असल्याने त्याबाबत चर्चाचे फड रंगले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना संदीप कोतकर यांनी अचानक आपल्या भूमिकेत बदल केला आणि निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. काही तांत्रिक अडचणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून दोन दिवसात नगरमध्ये येऊन आपण आपली सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोतकर यांच्या या निर्णयामुळे आता महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण असणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.