मुंबई। नगर सहयाद्री
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार यांनी सकाळीच भेट दिली. या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघा दिग्गज नेत्यांच्या भेटीला महत्त्व आले आहे. मनसेही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.
मनसे नेत्यांची देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांना भाजपचे केंद्रीय नेतृत्व दिल्लीला बोलावणार असल्याचेही बोलले जात होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत आगामी काळात मनसे महायुतीत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर लवकरच त्याचे उत्तर मिळेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.
राज ठाकरे आणि आशिष शेलार नेहमी भेटत असतात. वर्षानुवर्ष त्यांच्या भेटीगाठी होत आल्या आहेत. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत, आजही सदिच्छा भेट झाली असावी, त्यातून दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही. कारण निवडणुका नसतानाही भेटी होतात अशी प्रतिक्रिया दिली. भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात फारसा आयडॉलिजिकल डिफरन्स नाही. दोघांतले संबंध मैत्रीपूर्ण आहेत, ते राजकीय होतील का, याचा निर्णय राज ठाकरे घेतील, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, भाजप बेरजेचे राजकारण करतो. सर्व पक्षातील चांगल्या लोकांना एकत्रित करणे, समाज आणि विकासासाठी काही भूमिका घेणे हे स्वागतार्ह असेल.
युतीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. मात्र राज ठाकरे भूमिका निश्चित करतील, त्यावेळी भाजपचे राज्य आणि केंद्रीय नेतृत्व चर्चा करुन तसा निर्णय होऊ शकतो. कुठलाही चांगला नेता, पक्ष सामील झाला तर महायुतीला फायदाच होतो. आजच्या भेटीतून चांगलीच फलश्रुती होईल.