मुंबई | नगर सह्याद्री
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी थेट राजधानी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनला सुरूवात केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील गावागावातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव दाखल झाले आहेत. आता गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पक्का निर्धार केल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. त्यांच्या या आंदोलनला महायुतीमधील काही आमदार आणि खासदार यांनी पाठिंबा दिला आहे. अशातच त्यांनी आझाद मैदानावरून आता निर्धार पक्का, मागं हटायचं नाय! अशी मोठी गर्जना केली. याशिवाय आंदोलकांना महत्वाचे आवाहन केलं आहे.
पुढील 2 तासांत मुंबई रिकामी करा
आझाद मैदानावर ठरवल्याप्रमाणे आलो, उपोषण सुरु केलंय, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली. सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले. आंदोलनाला आधी परवानगी नव्हती. त्यानंतर सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली. सरकारने सहकार्य केलं, आता आपणही सहकार्य करु, असं मनोज जरांगेंनी सांगितले. कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही. मराठा बांधवांनी गोंधळ घालायचा नाही, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. तसेच मोठ्या प्रमाणात याठिकाणी गद झाली आहे. काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी येथे जावे, पुढील 2 तासांत मुंबई रिकामी करा…काहीजण वाशीत मुक्काम करा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. मुंबईत आंदोलकांची अडचण होऊ नये, पावसाचे दिवसही आहे. त्यामुळे काही आंदोलकांनी मुंबई सोडून मुंबईच्या वेशीवर असलेल्या वाशीत आंदोलन सुरु करावे, असं आवाहन मनोज जरांगेंनी केले.
मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही : मनोज जरांगे
मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. पोलिसांना सहकार्य करा, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आपण कोणाला बोलायला संधी द्यायची नाही. दारु प्यायची नाही. माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका…याच आझाद मैदानात राहायचं आणि झोपायचं, असं मनोज जरांगे उपस्थित मराठा आंदोलकांना म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या
मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
हैदराबाद गॅझेटियर लागू करा…सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
आंदोलकांना आवाहन
कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचं नाही.
मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मागे हटायचं नाही.
दारू पिऊन धिंगाणा घालू नका, माझ्या समाजाची मान शरमेने खाली जाईल असं काही करू नका.
कोण काय सांगतयं, कोण राजकीय पोळी भाजतंय, त्यासाठी कोणी आपल्या आंदोलकांचा वापर करतंय का ते पाहा.
दोन तासांत मुंबई मोकळी करा, एकही पोलीस नाराज झाला नाही पाहिजे.
तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल : आ. रोहित पवार
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यावर आमदार रोहित पवार म्हणाले मुंबईतील खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? असा सवाल त्यांनी केला आहे. आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करतर असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल. आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रोहित पवारांनी त्यांच्या एक्स पोस्टमधून केली आहे. या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा! असं देखील रोहित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
भाजपने भूमिका केली स्पष्ट; आघाडीतील नेत्यांवर टीकेची झोड
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनला महायुतीमधील काही आमदार आणि खासदार यांनी पाठिंबा दिल्याची माहिती आहे. अशातच आता भाजपकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली असून, आघाडीतून तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी ओबसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भाजपाची भूमिका असल्याचं सांगितलं आहे. तसेच मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उध्दव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष गप्प का? असाही सवाल त्यांनी केला आहे.
सरकार उलथून टाकण्याचा राजकीय कट : लक्ष्मण हाके
मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा बांधवांचं आरक्षणाच्या मागणीसाठी भगवं वादळ धडकलं आहे. आता या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलनावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. मराठा आरक्षणाचा लढा हा केवळ आरक्षणासाठी नसून, राज्यातील सरकार उलथून टाकण्यासाठी एक राजकीय अजेंडा आहे. या कटात विरोधी पक्ष तर सामील आहेत, पण त्याचबरोबर अजित पवार गटाचे आमदार आणि खासदार देखील सहभागी आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांचे सरकार उलथवून लावण्यासाठी विरोधी पक्ष त्यात सहभागी असेल असं मी आजपर्यंत म्हणायचो. पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी ज्याप्रमाणे विरोधी पक्षाचे नेते सामील आहेत, तसेच अजित पवारांचे आमदार खासदार त्यात सहभागी आहेत.जरांगेंची मागणी पूर्ण झाली तर राज्यातील ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
सरकारची पूर्ण सहानभूती : अध्यक्ष विखे पाटील
जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारची सहानभूती आहे. सरकारने हा प्रश्न कधीच प्रतिष्ठेचा केला नाही. त्यांच्या मागण्या सरकारने विचारात घेतल्या आहेत. विशेषतः हैदराबाद गॅझेटप्रमाणे कुणबी दाखला देण्याची कारवाई अद्यापही सुरू आहे, याकडे मराठा समाज मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष वेधले. तरीही कोणी दाखल्यांपासून वंचित राहिले असतील तर न्यायमूत संदीप शिंदे यांच्या समितीकडून उचीत कार्यवाही करण्यात येईल. तर इतर ज्या मागण्या आहेत, त्यांच्या नवीन मागण्या असतील तर त्यावर चर्चा होईल, विचार होईल, असे विखे पाटील म्हणाले. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. सर्वांचीच भावना आहे की आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले. त्यामुळे आरक्षणासंदर्भात प्रशासकीय स्तरावर सुद्धा कार्यवाही सुरू असल्याचे विखे पाटील यांनी समोर आणले. हैदराबाद गॅझेटसोबतच सातारा गॅझेटबाबत काय प्रक्रिया सुरू आहे, याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या आमदार, खासदारांचा आंदोलनाला पाठिंबा
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला चार सत्ताधारी पक्षातील आंमदारांचा पाठिंबा आहे. विजयसिंह पंडित (अजित पवार गट), राजू नवघरे अजित पवार गट), विलास भुमरे (शिंदे गट) आणि प्रकाश सोळंके (अजित पवार गट) यांचा आमदारांचा जाहीरपणे पाठिंबा असून ते आंदोलनामध्येही सहभागी झाले आहेत. तर मविआमधील आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, नीलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट), खासदार संजय जाधव, नागेश आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) यांचा पाठिंबा आहे.