Politics News: शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीवरून मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या प्रश्नांवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता मंत्री उदय सामंत यांनी सुषमा अंधारे यांना खासदार नरेश म्हस्केंसोबतच्या भेटीवरून सवाल केले आहेत. सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंवर का नाराज होत्या? त्या शिवसेनेत कधी येणार होत्या? असे सवाल उदय सामंत यांनी केला होता. आता यावरुन सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
सुषमा अंधारे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खुलासा करताना नरेश म्हस्के यांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले. ती भेट मी मुद्दामहून घेतली नव्हती, ती योगायोगाने झाली. महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनमध्ये चहा पीत असताना जर त्यांच्यासमोर कोणी येऊन चहा घेतला असेल, तर इतकी संस्कृती आपली आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला मला बोलवा
एका सहज आणि स्वाभाविक भेटीला उदय सामंत यांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ सामंत यांच्या वर्मी घाव लागला असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. या स्पष्टीकरणानंतर सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. मी उदय सामंत यांचे उपमुख्यमंत्री होण्याचे मनसुबे उधळलेत की काय, असे मला वाटायला लागले आहे. तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला बहीण म्हणून मला बोलवा,” असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
उदय भाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात..! आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण उदय भाऊ, आपला वार अगदीच बेकार गेला आहे. पण या निमित्ताने का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिव्हारी लागलंय हे लक्षात आलं असो…, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
उदय सामंत काय म्हणाले?
दरम्यान माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी सुषमा अंधारे यांना काही थेट प्रश्न विचारले होते. त्यात त्यांनी सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंवर का नाराज होत्या? त्या शिवसेनेत कधी येणार होत्या? आणि त्या दिल्लीत खासदार नरेश म्हस्केंना का भेटल्या? असे सवाल केले होते. नरेश म्हस्के यांच्या कथित भेटीवरून सुरू झालेल्या वादातून सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून त्यांना डिवचल्याचे पाहायला मिळत आहे.



