Rain update: जागतिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी भारतात ला निना सक्रिय राहाण्याचा अंदाज आहे, त्यामुळे यंदा पावसाचं प्रामाण हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास, जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जूनपर्यंत स्थिती अशीच राहिली तर राज्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षाची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. नवं वर्ष आपल्याला कसं जाणार ? नव्या वर्षात पाऊस पाणी कसा असणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता असते. कारण भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे येथील बहुतांश अर्थव्यवस्था आजही पावसावर अवलंबून आहे. मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यास मार्केटमध्ये तेजी दिसून येते.
जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदानुसार पुढील वर्षी २०२५ मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात ला निनासाठी अनुकूल वातावरण बनत असून, या काळात ला निना सक्रिय होण्याची शक्यता ५५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
ला निना आणि अल निनो हे दोन वाऱ्यांचे प्रकार आहेत. याचा परिणाम हा भारतातील मान्सूनच्या पर्जन्यमानावर होतो. जर ला निना सक्रीय असेल तर चांगला पाऊस पडतो. कधीकधी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो. मात्र जर अल निनो सक्रिय झाले तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो.