spot_img
महाराष्ट्रपाणीचोरीतील पुणेकरांची दादागिरी थांबेल?; कुकडीसह साकळाई योजना दृष्टीक्षेपात

पाणीचोरीतील पुणेकरांची दादागिरी थांबेल?; कुकडीसह साकळाई योजना दृष्टीक्षेपात

spot_img

पाणीदार खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या
सारिपाट / शिवाजी शिर्के

मंत्रीमंडळाच्या विस्तारात दुसर्‍या क्रमांकाचा शपथविधी झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कोणत्या खात्याचा पदभार येणार याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले होते. महसूल खात्याने हुलकावणी दिल्यानंतर त्यांच्याकडे जलसंपदा हे खाते आल्याचे समोर आले. जलसंपदा हे दुय्यम महत्वाचे खाते मानले जात असले तरी विखे पाटलांनी या खात्याच्या माध्यमातून वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी न्याय देण्याची भूमिका घेतली. दिवंगत नेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी समुद्रात वाहून जाणार्‍या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्याचे पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात येण्यासाठी विखे पाटील प्रयत्न करताना दिसतील. मात्र, त्याहीपेक्षा पुणेकरांकडून नगरचे हक्काचे पाणी पळवले जात असल्याचा आरोप आणि त्या विरोधात सातत्याने आवाज उठविण्याचे काम स्व. विखे पाटील यांनी जसे केले तसेच काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील केले. आता त्या खात्याचेच विखे पाटील मंत्री झाले असल्याने पुणेकरांच्या पाणी चोरीबाबत ठोस भूमिका ते घेतील का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळविण्याच्या मुद्यावर शेवटपर्यंत पाठपुरावा केला. याचाच एक भाग म्हणून विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेचे व्यासपीठ त्यांनी तयार केले. पाणी परिषदेचा एक दबाव गट त्यांनी सातत्याने सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी वापरला. डोंगर, दर्‍याखोर्‍यात जाऊन पश्चिम भागातील नद्यांचा अभ्यास करून शासनाला त्याबाबत अहवाल सादर केला. देवेंद्र फडणवीस यांनीही वेळोवेळी लक्ष देऊन या विषयाचे बारकावे समजावून घेतले.
महाराष्ट्र पाणी परिषदेने सादर केलेल्या मसुद्याचे यामुळेच धोरणात रूपांतर झाले. वडिलांनी आयुष्यभर पाहिलेले स्वप्न या खात्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्याची तसेच पंतप्रधान मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याची संधी विखे पाटील यांना या निमित्ताने मिळाली आहे. याशिवाय या खात्याच्या माध्यमातून पाट पाण्याचे, निळवंडेचे उर्वरित कालवे, चार्‍यांचे प्रश्न मार्गी लावता येणार आहेत. वहन क्षमता हरवलेल्या ब्रिटिशकालीन गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण या मंत्रिपदामुळे दृष्टिपथात आले आहे.

विखे पाटलांना तुलनेने कमी महत्वाचे खाते मिळाल्याची चर्चा झडत असली तरी ते स्वत: ही चर्चा साफ फेटाळून लावत आहेत. वजनदार खात्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा नदीजोड प्रकल्प मार्गी लावण्याच्या जोडीने वडिलांच्या स्वप्नातील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलसंपदासारख्या पाणीदार खात्याला पसंती दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नगर जिल्ह्यातून सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा मान त्यांना आता मिळाला आहे. शिर्डीसह नगर जिल्ह्यातील जनतेने विखे पाटील परिवारावर सातत्याने प्रेम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शालिनीताई विखे पाटील यांना जिल्हा परिषदेत दोन वेळा अध्यक्ष होण्याची आणि सुजय विखे पाटील यांना लोकसभेत निवडून जाण्याची संधी मिळाली. पाटपाणी आणि कालव्यांच्या माध्यमातून उत्तरेतील पाणी प्रश्न निकाली काढण्यात विखे पाटलांचे योगदान सर्वश्रूत आहे. मात्र, दक्षिणेतील जिरायती भागाचा पाणी प्रश्न अद्यापही फारसा निकाली निघालेला नाही.

कुकडीसह पिंपळगाव जोगा धरणाचे कालवे, आवर्तने आणि या कालव्यांच्या माध्यमातून नगरला मिळणारे कमी पाणी यासह नगर – श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरणारा साकळाई सारखा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प विखे पाटलांच्या माध्यमातून मार्गी लागावा अशी अपेक्षा आता नगरकरांमधून व्यक्त होत आहे. साकळाई योजनेबाबत अत्यंत महत्वाचे काम सुजय विखे पाटील यांनी लोकसभा सदस्य असताना शेवटच्या टप्प्यात केले. आचारसंहिता लागण्याच्या आधी ही योजना अंतिम टप्प्यात आणली आणि लागलीच आचारसंहिता लागू झाली. एक आठवड्याचा अवधी यात मिळाला असता तर या योजनेचा श्रीगेणशा सुजय विखे पाटील यांच्याच हस्ते झाला असता या मतदारसंघाचा निकाल देखील कदाचित बदलला असता. आता हेच खाते विखे पाटलांकडे आले असल्याने नगर तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

पुणेकरांकडून नगरच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप पद्मभूषण विखे पाटील हे सातत्याने करत आले. कुकडी नदीवर अनधिकृतपणे बंधारे बांधले गेले आणि या बंधार्‍यांमध्ये कोणताही अधिकार नसताना पाणी सोडले जात असल्याचे विखे पिता- पुत्रांनी जसे निदर्शनास आणून दिले तसेच सुजय विखे पाटील यांनीही! आता कुकडी नदीवरील या अनधिकृत बंधार्‍यांचे काय आणि या बंधार्‍यांमध्ये अनधिकृतपणे सोडल्या जाणार्‍या पाण्याचे काय याबाबत निर्णय घेण्याची वेळ या खात्याचे मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आली आहे.
पाण्याच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविण्याचे काम आणि हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशी भूमिका घेण्याचे काम पद्मभूषण विखे पाटलांनी केले. त्यांच्याच हयातीत हे काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आणि कालपर्यंत त्यांनी याबाबत आवाज उठविला. सुजय विखे पाटील हे देखील यात काकणभर पुढेच राहिले. एकूणच नगरच्या पाणीप्रश्नांच्या सोडवणुकीतून विखे पाटील यांचे अहिल्यानगरसह राज्यातील स्थान अधिक उठावदार व बळकट होण्यासाठी त्यांना अभिप्रेत असेच पाणीदार खाते त्यांना मिळाले आहे. आता या खात्याच्या माध्यमातून नगरला किती आणि कसा न्याय मिळतो हे पाहावे लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमणावरून राडा; नेमका कसा घडला प्रकार पहा…

नगरसेवक पठारेंना पोलीस कोठडी | परस्परविरोधी फिर्याद | पठारेंचे १० लाख चोरले पारनेर | नगर...

संतोष देशमुख हत्या; बीडमध्ये मोर्चा : फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा; मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा, कोण काय म्हणाले पहा…

बीड | नगर सह्याद्री बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण...

तरुणावर धारदार शस्राने वार!; नालेगावात धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर धारदार शस्राने वारकरून जीवे मारण्याचा प्रयत्न...

अल्पवयीन मुलीचे लग्न लावले? आई वडिलांसह सहा जणांना भोवले..पतीचा दुसरा विवाह उजेडात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पहिल्या पत्नीसोबत घटफोट न घेता, दुसऱ्या अल्पवयीन मुलीशी विवाह करत...