मुंबई / नगर सह्याद्री :
५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड घडली. मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. तब्बल २० वर्षांपूर्वीच्या झालेल्या सगळ्या गोष्टी विसरून त्यांनी या मुद्यावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे.
तर दुसरीकडे दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत काही नेत्यांकडून दिले जात आहेत. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधान करून मोठा संकेत दिला आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलावे लागले असं मोठं विधान तटकरे यांनी केले आहे. यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विधानाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. शरद पवार यांनी अगोदर विरोध पण आणि नंतर एकत्र येण्याबाबत अनुकूल संकेत दिले आहेत.
शरद पवारांचे सूचक विधान
२८ जून २०२५ रोजी शरद पवार यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं होतं. सगळे मतभेद विसरून चांगले काम केलं तर वाईट वाटायचं काम नाही असे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर त्यांनी भाष्य केलं होतं. मनसे आणि शिवसेना एकाच मंचावर आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी उत्तर दिलं होतं.