बीड / नगर सह्याद्री :
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आले. विधानसभेचा निकाल लागून आणि सरकार स्थापन होऊन आता ३ ते ४ महिने होत आले आहेत. मात्र, लाडक्या बहिणींना दरमहिना २१०० रुपये मिळाले नाहीत. ते पैसे कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच जण विचारत आहेत. याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी तरुणांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेबाबत मोठं विधान केले आहे. ते म्हणाले, लाडक्या बहिणीला आपण १५०० रुपये देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणारा असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना २१०० नेमके कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेले नाही. ते बीडमधील कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतकरी कर्जमाफीबद्दल अजित पवार म्हणाले, माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का? असं विधान अजित पवारांनी केले होते. त्यानंतर 31 मार्चच्या आत कर्जभरणा करा असेही ते म्हणाले होते. त्यावरूनही सर्वत्र टीकेची झोड उठवली होती. त्यावर अजितदादा स्पष्ट बोलले. पीक कर्ज भरा असे म्हटल्यावर माझ्यावर काही जणांनी टीका केली. पण याबाबत मी जाहीरनाम्यात बोललो होतो, पण भाषणात कुठेही बोललो नव्हतो, असे अजित पवार म्हणाले.
मला शाल- हार घालू नका. मला शाल घालतात कागद तसाच असतो तो खाली पडतो तर हार घालताना कॅरीबॅग तिथेच पडतात. मी आता त्या कॅरी बॅग उचलतो. आताचे पुढारी हे पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. पाया पडले की उगाच लाचार झाल्यासारखे वाटते. पाया पडण्यापेक्षा रामराम, नमस्कार असे म्हणा. तसेच प्रवक्त्याने तोलून मापून बोलावं. कोणत्याही समाजाच्या किंवा पक्षाच्या भावना दुखवता कामा नये. आपण संयमाने बोलावे, असे आवाहन अजित पवारांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.