पुणे / नगर सह्याद्री : राज्यसभेच्या सहा जागांसाठी सध्या निवडणुका होत आहेत. आता यासाठी भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक या जागेंसाठीच्या उमेदवारासाठी पार पडली. परंतु उमेदवार कोण असावा यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे समोर आले आहे.
सुनील तटकरे, समीर भुजबळ यांच्यासह पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी पार्थ पवार यांचं नाव सर्वात आघाडीवर होतं. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा कानावर येताच शरद पवार गटाचे नेते, आमदार आणि पार्थ पवार यांचे सख्खे चुलत बंधू रोहित पवार यांनी पार्थ यांच्यावर टीका केली आहे. रोहित यांनी पार्थ यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे.
रोहित पवार यांनी पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीच्या चर्चेवरून उपरोधिक टीका केली आहे. राज्यसभेवर अभ्यासू लोकांना पाठवलं जातं. पार्थ पवार हे त्या पद्धतीचे उमेदवार आहेत. एखादा विचारवंत राज्यसभेवर गेल्याने जर राज्याचा आणि देशाचा फायदा होईल असं जर अजित पवारानं वाटत असेल तर ते पार्थ यांना पाठवतील. हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.