अहमदनगर । नगर सहयाद्री: –
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आल्यावर 40 मिनिटांतच घोषणा करण्यात आली. प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्ह्याचे नाव बदलले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन सभेत प्रा. शिंदे यांनी सांगितले की, नामांतराचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. आचारसंहितेपूर्वीच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याचिकाकर्ते शेख मसूद इस्माईल शेख व अन्य विरुद्ध केंद्र सरकार व अन्य अशा या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, नामांतराच्या प्रश्नावर वेगवेगळी मते असू शकतात. एखाद्या विभागात राहात असलेल्या लोकांचे त्याच्या नावाबद्दल बाजूने किंवा विरोधात मत असू शकते. न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार वापरून न्यायालयाने अशा प्रकरणांवर तोडगा काढावा असे म्हटले जाते.
सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. न्यायमूळख हृषीकेश राय व न्या. एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.
पण ज्या यंत्रणांकडे नावे देण्याचा अधिकार आहे, त्यांना नावे बदलण्याचाही अधिकार आहेच. नेमका हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात ठळकपणे नमूद केला आहे. त्यामुळे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हीही कायम ठेवत आहोत. महाराष्ट्र सरकारने नामांतराची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडली आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.