संगमनेर | नगर सहयाद्री :-
तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कुर्हाडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (३१ जुलै) पहाटे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घारगावमधील खंदारे वस्ती येथील दगडू लक्ष्मण खंदारे (वय ६५) याने आपल्या पत्नी चंद्रकला दगडू खंदारे (वय ६०) यांच्यावर चारित्र्यावर संशय घेऊन कुर्हाडीने डोक्यावर वार करून जागीच ठार केले. या घटनेची माहिती मिळताच घारगावचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर मुलगा भीमा दगडू खंदारे (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात करत आहेत. दरम्यान, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.