अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने पत्नी सपना अर्जुन शिंदे आणि सासरे राजू तायगा शिंदे यांच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सपना यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अर्जुनविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, 27 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास अर्जुन दारू पिऊन घरी आला. कोणतेही कारण नसताना त्याने सपना यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. सासू ताई राजू शिंदे, सासरे राजू तायगा शिंदे आणि सासूबाई यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, अर्जुनने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने लोखंडी कोयता उचलून सपना यांच्या डाव्या कपाळावर आणि सासरे राजू यांच्या डोक्यावर वार करून जखमी केले.
रक्तबंबाळ अवस्थेत नातेवाइकांनी सपना आणि राजू यांना अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी राजू यांच्या डोक्याला सहा टाके घातले. उपचारानंतर सपना यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रवीण खंडागळे पुढील तपास करीत आहेत.