पुतळा व नाट्यगृहाचे काम तात्काळ पूर्ण करा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नुकतेच मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर फ्लेसमुक्त करणार असल्याचे धोरण जाहीर केले. अनधिकृत फ्लेसवर कारवाई केली जाईल असे सांगितले. मात्र काही तास उलटले नाही तोच काँग्रेसने मनपाच्या गलथान कारभारावर सवाल उपस्थित केला आहे. प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये लावण्यात आलेल्या राजकीय अनधिकृत फ्लेस वरून हेच का मनपा आयुक्तांचे फ्लेसमुक्त शहराचं धोरण?, असा जाहीर सवाल करत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी निशाणा साधला आहे.
काळे म्हणाले की, शहराचं बॅनरबाजीमुळे विद्रूपीकरण होत आहे. हे थांबवत शहर स्वच्छ केल पाहिजे. मनपान जाहीर केलेल्या धोरणाच काँग्रेसच्यावतीने स्वागत करतो. मात्र मनपाच धोरण हे सर्वांसाठी समान नसून सत्ताधारी राजकीय पक्षांना यातून सूट देण्यात आली आहे. म्हणूनच इतर राजकीय पक्ष तसेच व्यावसायिक जाहिरातींचे फलक मनपाने काढले खरे. मात्र काहींना यातून मनपाने सूट दिली आहे. काळे म्हणाले की, आयुक्तांनी सांगितलं होतं की इथून पुढे शहरात फ्लेस लावण्यापूर्वी मनपाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
परवानगीचा क्रमांक संबंधित फ्लेसवर छापावा लागेल. तो न छापता फ्लेस लावला गेल्यास फ्लेस छपाई करणार्या प्रिंटर्सवर देखील गुन्हा दाखल केला जाईल. ज्यांचे फ्लेसवर फोटो, नावे आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जातील. आता मनपा या राजकीय फ्लेस बाजी करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमक दाखवणार काय?, असा जाहीर सवाल किरण काळे यांनी आयुक्त डांगे यांना केला आहे.
किरण काळे यांनी म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच आणि पुतळ्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या ठिकाणी फ्लेसचा बाजार भरला आहे. मनपाने ही जागा तात्काळ फ्लेसमुक्त करत रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे.
नाट्यगृहाबाबत आश्वासने नको कृती हवी
फ्लेसबाजीच्या छायाचित्रात मागे मनपाच्या प्रलंबित नाट्यगृहाचा भगनावस्थेतील सांगाडा दिसत आहे. काँग्रेसने यापूर्वी देखील पोलखोल करत या ठिकाणी तळीरामांच्या भरलेल्या अड्याचं ओंगळवाण चित्र मनपा समोर मांडलं होतं. मात्र अनेक दिवस उलटूनही हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. कालच या जागेची पाहणी शहराच्या लोकप्रतिनिधींनी करत लवकरच हे काम पूर्ण होईल असे म्हटले. त्यावर नुसती आश्वासने नको कृती करा. असे सांगत नाट्य, साहित्य, संगीत कलाकार आणि रसिकांची मागणी पूर्ण करा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा जाहीर इशारा किरण काळे यांनी दिला आहे.