शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा इशारा
अहिल्यानगर / नगर सह्याद्री-
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश महानगरपालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण रचना जाहीर करण्यात आली असताना, अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रभाग रचना मात्र मुदत संपूनही जाहीर झालेली नाही. त्यामुळे शहरात प्रभाग रचनेवरून वाद निर्माण झाला असून, या प्रकरणामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केला आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपल्या उमेदवारांना सोयीस्कर ठरतील अशा पद्धतीने प्रभागांचे फेरबदल केले आहेत. निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मुदतीनंतरही मनपात रचना बदलण्याचे प्रकार सुरू आहेत, हे गंभीर आहे.”
ते पुढे म्हणाले, “मागील निवडणुकीत प्रभाग रचना आयताकृती आणि आडव्या पद्धतीची होती. पण यावेळी झेंडीगेटपासून नालेगावपर्यंत एकच वॉर्ड बनविण्यात आला असून, ज्या भागांतील रहिवाशांचा एकमेकांशी संबंधच नाही, अशा क्षेत्रांना कृत्रिमरीत्या एकत्र करण्यात आले आहे. दलित वस्त्यांची विभागणी करून त्या वेगळ्या प्रभागात जोडण्यात आल्या आहेत. महामार्ग, उड्डाणपूल, नदीकाठाचे भागसुद्धा विभागले गेले असून, हे नियोजन विरोधी पक्षातील उमेदवारांना गैरसोयीचे ठरावे म्हणून केलेले स्पष्ट दिसते.”
जाधव यांनी आरोप केला की, “ही संपूर्ण रचना भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या सल्लामसलतीतून आखण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून, लोकशाही आणि न्यायाच्या तत्त्वांना विरोध करणारी आहे. आम्ही या अन्यायाविरुद्ध न्यायालयात जाणार आहोत.”
यासंदर्भात शिवसेना (उबाठा) गटाने मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निषेधपत्र देण्याची घोषणा केली आहे. तसेच प्रभाग रचनेतील अन्यायकारक फेरबदलाविरोधात निवडणूक आयोगाकडे आणि न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
जाधव यांच्या प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्रभाग रचना सर्व पक्षांसाठी समान न्यायाच्या तत्त्वावर केली गेली पाहिजे. पण सध्याची रचना लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणारी आहे. आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.”