मुंबई / नगर सह्याद्री : अभिनेत्री जया प्रदा हे चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांत अभिनय केलेला आहे. त्यांनी अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी तर केलीच शिवाय त्या राजकारणात देखील आहेत. त्या खासदार असून राजकारणात चांगल्याच सक्रिय आहेत.
मात्र, सध्या जया प्रदा यांच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. जया प्रदा यांना थेट कोर्टाने फरार घोषिक केलंय. जया प्रदा यांना अटक करण्यासाठी खास टीमही तयार करण्यात आलीये. याबाबतचे आदेश थेट कोर्टाकडूनच देण्यात आलेत. उत्तरप्रदेश आणि मुंबईला टीमही रवाना झाल्या आहेत. काही ठिकाणी जया प्रदा यांना अटक करण्यासाठी छापेमारीही सुरू आहे.
कोर्टाने जया प्रदा यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता जया प्रदा यांच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. 2019 मधील प्रकरण जया प्रदा यांच्या चांगलेच अंगलट येताना दिसत आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक जया प्रदा यांनी भाजपाकडून लढली होती. जया प्रदा यांच्या विरोधात समाजवादी पार्टीचे आजम खान होते.
जया प्रदा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले. यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. आचारसंहिता असताना त्यांनी नूरपुर गावाच्या रस्त्याचे उद्धाटन केले. मिश्रगांवमध्ये त्यांनी प्रचार सभेवेळी आपत्तीजनक टिप्पणी केल्याचे देखील त्यांच्यावर आरोप असून या प्रकरणात देखील गुन्हा हा दाखल करण्यात आलाय.
या प्रकरणातील सुनावणीस जया प्रदा कधीच हजर राहिल्या नाहीत. सात वेळा त्यांच्या विरोधात वारंट जारी करण्यात आले. तरीही त्या कोर्टात हजर झाल्या नाहीत. आता कोर्टाने जया प्रदा विरोधात कठोर कारवाई करत थेट त्यांना फरार घोषित केले. कोर्टाने रामपुर पोलिस अधिक्षकांना जया प्रदा यांना कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.