संगमनेर | नगर सह्याद्री
नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या अभिनंदनाचा फलक लावल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घुलेवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी ऋतिक राऊत, प्रतीक राऊत, गणेश उर्फ प्रतीक भास्कर पानसरे यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
जखमी गोविंद यादव पानसरे यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे त्यांचे काम सुरु असल्याने मागील काही वर्षापासून ते मोशी (जि. पुणे) येथे राहावयास आहे. अधून-मधून ते आपल्या मूळ गावी घुलेवाडी येथे वडील व भावाला भेटण्यासाठी येत असतात. रविवारी ते घुलेवाड़ी येथे आले होते. त्यांच्या भावाने व इतर मित्रांनी नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांचा अभिनंदाचा फलक घुलेवाड़ी येथील मौनगिरी चौकात लावलेला होता.
हा फलक काढून टाकावा असे काँग्रेसचे कार्यकर्ते ऋतिक राऊत व इतर आपणास सांगत असल्याचे त्याने आपल्या भावास सांगितले. यानंतर गोविंद पानसरे हे रात्री दहा वाजेच्या सुमारास आपल्या कारमधून पुणेकडे जाण्यासाठी निघाले. गावातील मौनगिरी चौकात आल्यानंतर तेथे त्यांचा चुलत भाऊ प्रतीक भास्कर
पानसरे, ऋतिक राऊत, प्रतीक राऊत व गावातील काही जण दिसले.
गोविंद पानसरे हे चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करुन गणेश उर्फ प्रतीक भास्कर पानसरे याच्याकडे गेले. यावेळी जवळच असलेले प्रतीक राऊत व ऋतिक राऊत यांनी गोविंद यांना शिवीगाळ सुरु केली, प्रतीक राऊत याने पानसरे यांच्या गाडीची चाबी काढत बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.