अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नुकतीच आमदार सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. आता या चर्चांना स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी पूर्णविराम देत कारणच स्पष्ट केले आहे. ही भेट राजकीय नव्हती तर भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव सरकारला देण्याबाबत होती अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले, ही भेट राजकीय नव्हती तर भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव सरकारला देण्याबाबत होती. भंडारदरा धरणाला 100 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे शताब्दी महोत्सवानिमित्त जलसंपदा व पर्यटन विभाग यांनी वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करावे व त्या ठिकाणाच्या पर्यटन वाढीला प्रोत्साहन व चालना देण्याकरिता एक आराखडा तयार करावा तसेच या ठिकाणी वॉटर म्युझियम साकारावे अशा पद्धतीची मागणी आपण केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वॉटर म्युझियम करिता जागेची आवश्यकता असून यावर गोदावरी पाटबंधारे नियमक मंडळाची नुकतीच बैठक देखील पार पडली असून या झालेल्या बैठकीत जलसंपदा व पर्यटन विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्याचा निर्णय झालेला आहे. या संदर्भातली जी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती फडणवीस यांच्या कार्यालयात सादर करण्यासाठी मी गेलो होतो. आपली व फडणवीस यांची भेट झाली नाही असे देखील त्यांनी सांगितले. यामुळे या भेटीमागे कुठल्याही प्रकारचे राजकीय कारण न होते असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सत्यजित तांबेंचा सरकारला प्रस्ताव
जिल्ह्यात असलेले भंडारदरा धरण हे जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचे असे धरण असून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या धरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा धरणाला येत्या 2026 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत असल्याकारणाने या धरणाचा शताब्दी महोत्सव साजरा करावा तसेच या धरणाच्या ठिकाणी भव्य असे वाटर म्युझियम उभारावे असा प्रस्ताव आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारला दिला आहे.