मुंबई । नगर सहयाद्री
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील मालकी हक्काच्या वादावर आज (बुधवार)पासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असून ती सलग तीन दिवस चालण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वी ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले होते. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
या प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावर मोठा परिणाम करू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, चिन्ह वाटप होणार आहे. त्यामुळे या सुनावणीचा निकाल त्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.



