विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल । ‘बाप’ नावापासून सुरू झालेलं राजकारण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल
अहिल्यानगर । नगर सहयाद्री-
संगमनेरमध्ये विखे आणि थोरात यांच्यातील वादाचा दोन दिवसापूर्वीच भडका उडाला होता. धांदरफळ येथील सभेत जयश्री थोरात यांच्याबद्दल वसंत देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वाद चिघळला होता. तसेच संगमेनरमध्ये जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली होती. आता याप्रकरणी जयश्री थोरात यांच्यासह 50 जणांवर आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जयश्री थोरात यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
जयश्री थोरात म्हणाल्या की, दोन दिवसापूर्वी जे काही झाले. ज्या पातळीवर जाऊन त्या माणसाने माझ्याबद्दल बोलले. मला न्याय देण्याच्या ऐवजी विषय भरकटवून उलटा पोलिसांनी माझ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्या पाठीमागे उभे राहणाऱ्या दुर्गाताई, डॉक्टर सुधीर तांबे यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल केला. आम्हाला पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आठ ते नऊ तास रात्रभर ठिय्या मांडावा लागला. मात्र आमच्यावर तातडीने गुन्हा दाखल केला. प्रशासन कोणाची कटपुतली आहे? कोणाच्या दबावाखाली प्रशासन काम करत आहे? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केलाय.
निवडणुका येतात आणि जातात. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण सुरू आहे. मी म्हणते की, माझा बाप हा केवळ माझा नसून इथे असलेल्या संपूर्ण जनतेसाठी ते वडीलधारे आहेत. तेव्हा त्याचा अर्थ घाणेरड्या पातळीवर घेतला जातो. यातून त्यांचे विचार दिसून येतात, असे म्हणत जयश्री थोरात यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत. तोडफोड केल्याप्रकरणी ते पोलिसांना निवेदन देणार आहेत. त्यांचं वागणं हे त्यांना शोभणार नाही. त्यांनी उलट माझ्याकडे येऊन माझे सांत्वन करायला पाहिजे होते. मात्र ते गाड्या फोडल्या प्रकरणी निवेदन द्यायला येत आहेत. इथे प्रत्येक महिलांच्या अब्रूला हात घातला गेलाय. महिला पेटून उठलेल्या आहेत. गाड्या येतात जातात, हा केवळ माझा अपमान नव्हता तर इथे असलेल्या प्रत्येक मातेचा अपमान करण्याचं काम करण्यात आले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.