राहुल कानडे । नगर सहयाद्री:-
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला. आतापर्यंत येथील मतदारांनी काँग्रेसला तारले आहे. मात्र, या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे महायुती कडून आटोकाट प्रयत्न चालू आहेत. मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये मोदीलाट थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखली होती. आता मात्र काँग्रेसकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी महायुती जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे.
जिल्हा विभाजनाची प्रलंबित मागणी असलेला श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ. माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक, गोविंदराव आदिक, जयंतराव ससाणे आणि भानुदास मुरकुटे यांच्याच भोवती फिरत राहिला आहे. त्यानंतर नगरसेवक असणारे भाऊसाहेब कांबळे हे आमदार झाले. २०१४ च्या निवडणुकीत श्रीरामपूरच्या राखीव मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार लहू कानडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असलयाचे सर्वश्रुत आहे.
भाजपकडून बालेकिल्ला सुरुंग लावण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु असुन नितीन दिनकर यांच्या नावाची चर्चा आहे. लोकसभेला शिंदे गटाला उमेदवारी मिळाली होती तर विधानसभेला भाजपलाच उमेदवारी मिळणारच असा दावा भाजपचे कार्यकर्त्य करत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देखील कंबर कसली आहे. तर नुकताच पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी तर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचाच उमेदवार देऊ, असे आश्वासन दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी करीत बालेकिल्ला सुरुंग लावण्याची तयारी केली आहे, तसेच जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान शेतकरी युवक संवाद यात्रेची सुरुवात केली आहे. यामुळे हेमंत ओगले देखील निवडणुकीच्या रींगणात असल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे महायुती श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात कुठला उमेदवार देणार याकडे मतदाराच्या नजरा लागल्या आहे.
आमदार लहू कानडे यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग
मतदारसंघात वीज, पाणी, शेती, महिला, बालकल्याण अशा सर्व क्षेत्रांत समतोल विकास करण्याचा प्रयत्न केला. मतदार संघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकास कामे केली, ज्या कामासाठी निधी आहे तो त्याच कामावर खर्च केला. मागील दहा वर्षांतील कामे व आपण केलेली कामे जनतेसमोर आहेत. या कामाच्या शिदोरीवरच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगत नुकत्याच पार पडलेल्या तालुका काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या तालुका पदाधिकार्यांच्या बैठकीत आमदार लहू कानडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
ससाणे गटाची मोठी ओट बँक
आपल्या स्वभावामुळे श्रीरामपूर मतदारसंघावर माजी आमदार जयंतराव सासणे यांनी पकड निर्माण केली होती. तालुक्यातील त्याची विकासकामे पाहता त्यांना मनानारा मोठा वर्ग आहे. त्याचे पुत्र करण ससाणे देखील श्रीरामपूर नगरपालिकांचे माजी उपनगराध्यक्ष होते. अनेक नगरसेवक देखील त्याच्या सोबतीला आहे. त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ससाणे गटाकडे काही हक्काची मते आहे. त्यामुळे ससाणे समर्थक कुणाच्या पाठीशी उभे ठाकता हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
आदिक गटाची भूमिका महत्वाची ठरणार
श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीत स्व. खासदार गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांनी मतदारांच्या मनावर राज्य करत आपला विजय प्रस्थापित केला होता. लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून गेली पाच वर्षे त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली आहे. तसेच प्रदेश सरचिटणीस पदाचे काम पाहणारे राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक हे दोन्ही पवारांशी चांगले संबंध ठेवून आहेत. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीला देखील ते उपस्थित होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आदिक गटाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
“नितीन दिनकर” तरुणाच्या गळ्यातील ताईत
पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक असणारे नितीन दिनकर यांनी तरुणाईच्या माध्यमातून राजकातरणातील पाया बळकट केला. धार्मिक कार्यक्रमात तसेच सुख दुःखात सहभागी होत त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. नितीन दिनकर यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील अनके विकासकामे देखील मार्गी लागली आहे. युवा कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वाढदिवसानिम्मित भावी आमदार अशा आशेचा बॅनर झळकताना देखील शहरात पहायला मिळाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून नितीन दिनकर यांना उमेदवारी मिळणार? अशी जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.