spot_img
अहमदनगरआझाद ठुबे यांचा स्पेस कोण भरून काढणार?

आझाद ठुबे यांचा स्पेस कोण भरून काढणार?

spot_img

जवळा जिल्हा परिषद गटात रस्सीखेच | सुजित झावरे, दीपक लंके, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत, डॉ. श्रीकांत पठारे, मारुती रेपाळे यांची नावे चर्चेत
गणेश जगदाळे | नगर सह्याद्री
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पारनेर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय जाणकार आता तर्क वितर्क लावू लागले आहेत. तालुक्यात पाच पैकी सुपा, ढवळपुरी व टाकळी ढोकेश्वर या तीन जिल्हा परिषद गटांमधून महिला आरक्षण आल्यामुळे अनेक बड्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. जवळा व निघोज जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आरक्षण निघाल्यामुळे या दोन गटांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पूवच्या कान्हूर पठार जिल्हा परिषद गटालाच आता जवळा जिल्हा परिषद गट असे नाव देण्यात आले आहे. हा गट माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांचा बालेकिल्ला आहे. परंतु राजे शिवाजी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी आझाद ठुबे हे अटकेत आहेत. व पतसंस्थेतील भ्रष्टाचारामुळे त्यांच्यावर आता मोठी नाराजी असल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते व कुटुंबीय दिसणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता जवळा जिल्हा परिषद गटांमध्ये अनेकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे.

महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके, ज्येष्ठ नेते पारनेर बाजार समितीचे संचालक मारुती रेपाळे हे इच्छुक आहेत. तर महायुतीकडून भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत हे इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये महिला आरक्षण आल्यामुळे सुजितराव झावरे पाटील यांना दुसरा जिल्हा परिषदेचा गट शोधण्याची वेळ आली असल्याने ते जवळा जिल्हा परिषद गटामध्ये आता चाचपणी करत आहेत. संधी मिळाल्यास ते निवडणूक लढवणार आहेत. सध्या शिवसेना शिंदे गटात त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुद्धा सुरू आहे. त्यामुळे धनुष्यबाण घेऊन महायुतीत ते सहभागी होणार का किंवा तालुक्यात निवडणुकीत स्वतंत्र यंत्रणा उभी करणार याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

महायुतीकडून गेल्या तीन ते चार वर्षापासून भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे हे जवळा जिल्हा परिषद गटामध्ये तयारी करत आहेत त्यांनी या गटांमध्ये अनेक विकासकामे माग लावले असून विकास कामांच्या जोरावर व पठार भागाच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने महायुतीमध्ये अचानक सुजित झावरे पाटील व अशोक सावंत हे स्पर्धेत आल्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये दीपक लंके हे सुप्तपणे तयारी करत होते. अनेक दिवसापासून ते या भागात फिरत होते. परंतु हा गट सुद्धा महिला आरक्षित झाल्यामुळे त्यांना आता दुसरा जिल्हा परिषद गट ऐनवेळी शोधण्याची वेळ आल्याने त्यांनी सुद्धा जवळा जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते. खासदार लंके यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यास दीपक लंके हे महाविकास आघाडी कडून येथे निवडणूक लढवण्यास तयार आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यात जवळा जिल्हा परिषद गट हा खऱ्या अर्थाने पूर्ण तालुक्याचा राजकीय सत्ता केंद्र बनत असून पूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या गटाकडे व या निवडणुकीकडे लागले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे हे सुद्धा गेल्या तीन ते चार वर्षापासून जवळा जिल्हा परिषद गटामध्ये तयारी करत आहेत. त्यांनी सुद्धा त्यांची यंत्रणा जवळा भागात व पठार भागावर उभी केली आहे. एक चांगला स्वच्छ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म त्यांनी तालुक्यात पाळला आहे. विधानसभेला ते इच्छुक होते परंतु तिकीट न मिळाल्यामुळे ते काहीसे नाराज होते. महायुतीच्या उमेदवाराला मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप केला गेला. परंतु त्यांनी तो खोडून काढला आहे. आत्ताही जिल्हा परिषदेला ते महाविकास आघाडी कडून जवळा जिल्हा परिषद गटात लढण्यासाठी तयार आहेत. तसेच राष्ट्रवादी पक्षाचा 2019 व 2025 मध्ये पारनेर तालुक्यात आमदार करण्यासाठी ज्यांनी तिकिटाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली असे अजित पवार यांचे जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत सुद्धा जवळा गटातून इच्छुक आहेत. त्यामुळे दुसऱ्याला तिकीट मिळवून देण्यास हातखंडा असलेले अशोक सावंत आता स्वतःला पक्षाकडून तिकीट आणून जवळा गटात उमेदवारी करणार का हे पाहणे आता राजकीय दृष्ट्‌‍या क्रमप्राप्त ठरणार आहे.

तसेच बाजार समितीवर गेल्या अनेक पंचवार्षिक संचालक म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते मारुतीराव रेपाळे हे सुद्धा महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. खासदार लंके प्रति त्यांची असलेली एकनिष्ठ भूमिका त्यांना उमेदवारीच्या रूपाने न्याय मिळवून देणार का? हे सुद्धा महत्त्वाचे आहे. या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये वडझिरे गावचे कामगार नेते शिवाजीराव औटी, कान्हूर पठारचे किरण ठुबे, कान्हूर पठार पतसंस्थेच्या चेअरमन सुशीला ठुबे, कोरठण देवस्थान सचिव चंद्रभान ठुबे, माजी सरपंच गोकुळ काकडे, सागर व्यवहारे, पुणेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, चिंचोली गावचे माजी सरपंच सतीश पिंपरकर, देवीभोयरे ज्येष्ठ नेते शिवाजी जाधव, पिंपरी जलसेन लहू थोरात, जवळा शिवाजी सालके, सुभाष आढाव, सभापती किसनराव रासकर, उपसभापती किसन सुपेकर, गांजीभोयरे डॉ. आबासाहेब खोडदे, सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे, शेतकरी नेते अनिल देठे, पिंपरी पठार सरपंच अनिल शिंदे, युवा नेते सुभाष परांडे, ज्येष्ठ नेते वसंत शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम एरंडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब दिघे, माजी सरपंच रामदास खोसे, उद्योजक विठ्ठल जाधव, पानोली कॉ. संतोष खोडदे, सांगवी सूर्या मोहन आढाव, भाऊसाहेब आढाव, बाभुळवाडे भाऊसाहेब जगदाळे, पिंपळगाव तुर्क गोकुळ वाळुंज, चिंचोली योगेश झंजाड, या सर्वांची भूमिका या निवडणूक प्रक्रियेमध्ये जवळा जिल्हा परिषद गटात महत्वपूर्ण ठरणार आहे.

त्यामुळे जवळा गटात इच्छुकांची संख्या वाढली असून माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांचा स्पेस कोण भरून काढणार यासाठीच खरी स्पर्धा आता येथे सुरू झाली आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये आझाद ठुबे यांना मानणारे समर्थक नेमका कोणासोबत जाणार हे येणाऱ्या काळातच समजणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष व महायुतीतील घटक पक्ष जर स्वतंत्र लढले तर तालुक्यात मोठा पेच प्रसंग निर्माण होणार आहे. व तिरंगी चौरंगी लढती दिसून येतील अनेक नवखे उमेदवार रिंगणात पाहिला मिळतील.

जवळा गट तालुक्याचे राजकीय भवितव्य ठरविणार…
ढवळपुरी, टाकळी ढोकेश्वर, सुपा झेडपी गटात महिला आरक्षण निघाल्याने जवळा जिल्हा परिषद गटात इच्छुकांची संख्या वाढली आहे. येथे अटीतटीची लढत होण्याची शक्यता असून पठार भागाचे नेते आझाद ठुबे यांचा स्पेस घेण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. या गटात निवडून येणारा उमेदवार भविष्यात तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होऊन पुढील विधानसभेचाच उमेदवार असणार हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही. त्यामुळे जवळा जिल्हा परिषद गट हा तालुक्याचे राजकीय भवितव्य ठरवणारा गट ठरणार असून येथे त्यामुळे तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.

गीतांजली शेळके, प्रशांत गायकवाड यांची भूमिकाही ठरणार निर्णायक
जवळा जिल्हा परिषद गटामध्ये महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके यांचे गाव पिंपरी जलसेन तर जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांचे गाव हत्तलखिंडी हे जवळा जिल्हा परिषद गटात येत असल्यामुळे यांची सुद्धा भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे जवळा जिल्हा परिषद गट हा या निवडणुकीमध्ये राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“स्थानिकांकडूनच खरेदी करा; हाच खरा स्वदेशी आणि हिंदुत्वाचा उत्सव” : नगरसेवक योगीराज गाडे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : दिवाळीचा सण जवळ आला असताना, नागरिकांनी स्वदेशी आणि स्थानिकांना प्राधान्य...

दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या बसला भीषण आग, २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण...

झेडपीसाठी मोठी अपडेट, 28 ऑक्टोबरला अंतिम…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 जुलै...

मुंबईतील पक्ष बैठकीनंतर आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप...