जामखेड। नगर सहयाद्री
बाजार समितीने व्यापार्यांना सेस भरण्यासाठी काढलेल्या नोटीस मध्ये सेस रक्कमेबाबत तफावत असल्यामुळे व्यापार्यांनी यापुढे शेतकर्यांच्या मालाची आवक व्यवस्था बाजार समितीने करावी आम्ही लिलावास तयार आहे असे सांगून दि. १२ पासून शेतकर्यांचा माल घेण्यास अचानक नकार दिला. याबाबत माहीती नसल्याने शेतकर्यांना खर्च करून आणलेला माल परत घरी किंवा दुसर्या तालुक्यात न्यावा लागला. याबाबत व्यापारी व बाजार समितीची बैठक निष्फळ ठरल्याने बंदचा तिढा सुटेना मात्र यात शेतकर्याचा काय दोष?
कृषी उत्पन्न बाजार समितीने दि. ५ फेब्रुवारी रोजी आडत व्यापारी यांना नोटीस पाठवून त्यांना सेसची रक्कम टाकून भरण्यास सांगितले. सर्व व्यापार्यांनी बैठक घेऊन बाजार समितीने दर्शवलेल्या सेस रक्कम भरण्यास नकार दिला व त्यांनी बाजार समितीला निवेदन दिले की, बाजार समितीने लायसेन्स धारक व्यापार्यांना मार्केट सेस आकारणी संदर्भात नोटीसी दिल्या आहेत. यामध्ये शेरा बाकीच्या नोटीसी मधील रक्कम व व्यापार्याच्या रजिस्टर्ड मध्ये नमुद केलेल्या सेस रकमेमध्ये तफावत आहे. सदर रक्कम भरण्यास व्यापार्यांनी असमर्थता दर्शविली आहे.
तसेच बाजार समिती कार्यालयामार्फत योग्य व संयुक्तीक मदत व सहकार्य मिळालेले नाही असा दावा केला आहे. तसेच यापुढे बाजार समितीने स्वताच्या अखात्यात शेतकर्यांचा माल उतरून घ्यावा आम्ही लिलाव करु व लगेच सेस भरू असे सांगत दि.१३ पासुन शेतकर्याचा माल उतरून घेण्यास नकार दिला. बाजार समितीचे सभापती शरद कार्ले व आडत व्यापारी यांची याबाबत बैठक झाली परंतु तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली आहे. शेतकरी रब्बी ज्वारी, गहु, हरबरा माल बाजार समितीत घेऊन येत आहे परंतु माल घेण्यास कोणी तयार नाही.
त्यामुळे शेतकर्यांना आपला माल घरी किंवा दुसर्या तालुक्यात घेऊन जावे लागत आहे. अगर खाजगी दुकानात बेभावाने विक्री करावे लागत आहे. यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. बाजार समितीने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करून बंद बाबत शेतकर्यांना माहिती देणे गरजेचे आहे. यासर्व प्रकाराकडे सहकार विभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. यापुढे शेतकर्यांचा माल बाजार समिती घेईल की व्यापारी हा प्रश्न निर्माण झाला आहे. या तिढ्याकडे मात्र सहकार खात्याने दुर्लक्ष केले आहे.
२० फेब्रुवारी रोजी निर्णय
व्यापायांनी ३१ मार्च पर्यंत शेतकर्यांचा माल घेऊन सहकार्य करावे, एक एप्रिल पासून बाजार समिती स्वतःमाल घेईल याबाबत २० फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.
– शरद कार्ले सभापती (बाजार समिती, जामखेड)
रजिस्टर मधील रक्कम व आमच्या नोंदीमध्ये तफावत
बाजार समितीने सेस बाबत त्यांच्या रजिस्टर मधील रक्कम व आमच्या दप्तरी असलेल्या नोंदी यामध्ये तफावत आहे. त्यामुळे आम्ही सेस रक्कम त्यांच्या नोटीसी प्रमाणे भरू शकत नाही. यापुढे बाजार समितीने शेतकर्यांचा माल उतरून घ्यावा आम्ही लिलाव करू व सेस भरू.
– विनोद नवले, आडत व्यापारी
शेतकराच्या अर्थिक नुकसानाला जबाबदार कोण?
लग्न सराई व उन्हाळी पिके घेण्यासाठी रब्बी ज्वारी, हरभरा घेऊन बाजार समितीत आलो पण माल कोणी घेईना याबाबत बाजार समितीने शेतकर्यांना माहीती देणे गरजेचे आहे. खाजगी दुकानदार बेभावाने माल घेतात त्यामुळे आमच्या अर्थिक नुकसानाला जबाबदार कोण आहे ? असा प्रश्न करून हीच का मोदींची गॅरंटी असा प्रश्न केला आहे.
-अंकुश भोरे, शेतकरी, कवडगाव