अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
आमदार संग्राम जगताप यांना त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाइलवर मेसेज पाठवून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी तेलंगणातून अटक केली. आरोपी बीड जिल्ह्यातील असून, त्याने धमकीचा मेसेज पाठविल्याची कबुली दिली आहे.अनिस महंमद हनिफ शेख (वय 32, रा. रुस्लाबाद पो. चकलंबा, ता. गेवराई, जि. बीड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीच्या अकाउंटवरून बुधवारी एक मेसेज आला होता. त्यात आमदार जगताप यांना मदो दिन के अंदर खत्म करूंगाफ असे म्हटले होते. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विलेषणात शेख याचे नाव समोर आले होते. आरोपी गेवराई तालुक्यातील असल्याचे समोर आले. तो तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
गुन्हे शाखेचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी तेलंगणाला रवाना झाले. तिथे शोध घेऊन आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपासासाठी आरोपीला कोतवाली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.आ. संग्राम जगताप यांना अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या दोन धमकी प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियुक्त करून तपासाचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेतला.