श्रीरामपूर । नगर सहयाद्री-
वाळू माफीयांपासून ते पतसंस्था माफीयांना पाठबळ देवून मजा कोणी लुटली हे जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. सोयीनुसार आणि स्वतःच्या स्वार्थाकरीता काँग्रेस पक्षाचा वापर करून पक्ष संपविण्याची खरी मजा आ. बाळासाहेब थोरात घेत असल्याची घणाघाती टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केली.
लंघे यांनी म्हटले की, आ. थोरात यांनी तालुक्यात आणि जिल्ह्यात राजकारण करताना फक्त माफीयांना पाठबळ दिले. महसूल मंत्री असताना वाळू माफीयांचा उच्छाद जनतेन अनुभवला. गावोगावी माफीयाराज तयार होत असताना माजी मंत्री थोरात बघ्याची भूमिका घेत होते. या माफीयांना राजकीय पाठबळ देवून कोण मजा लुटत होते हे सर्व जनतेन पाहीले असल्याने खा. सुजय विखेंवर टीका करताना विचार करण्याचा त्यांनी सल्लाही दिला.
काँग्रेस पक्षाच्या झालेल्या दुरावस्थेला थोरात यांच्या सारख्या नेत्याची भूमिका कारणीभूत असून, सोयीनुसार पक्षाचा उपयोग करायचा आणि स्वार्थाकरीता निष्ठेचा खोटा कळवळा दाखवत सर्व पदे केवळ घरात मिळवायची. साधे तालुक्याचे अध्यक्षपद सुद्धा आपल्या मुलीला देऊन कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याची मजा सुद्धा तुम्ही घेताय का? असा सवाल लंघे पाटील यांनी केला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा कसा पराभव घडवून आणला. त्याची कशी मजा पाहिली हे सुध्दा सुध्दा महाराष्ट्राने पाहीले आहे. असा टोला लगावून थोरातांच्या स्वार्थी राजकारणामुळे नगर जिल्ह्यात काँग्रेसला एकही उमेदवार मिळवता आला नाही हेच मोठे दुर्देव म्हणावे लागेल असे लंघे पाटील म्हणाले.