spot_img
अहमदनगरगुन्हेगारांना अभयारण्य सदृश सुरक्षीतता नक्की कोणामुळे?

गुन्हेगारांना अभयारण्य सदृश सुरक्षीतता नक्की कोणामुळे?

spot_img

नगरचा बिहार झाला असेल तर मग…? अल्पवयीय मुलींना फूस लावून पळविणारे पोट्टे कोणाचे अन्‌‍ त्यांना अभय कोणाचे?
सारिपाट / शिवाजी शिर्के:-
स्वारगेट प्रकरणाने राज्य ढवळून निघाले असताना संपूर्ण राज्यात कायद्याचा धाक राहिला आहे काय, असा थेट प्रश्न उपस्थित केला गेला. वास्तविक हा प्रश्न उपस्थित करत असताना सर्वच घटकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राजकारणाचा वाढता अतिरेक विचारात घेता आपण हा समाज कोणत्या दिशेने घेऊन चाललो आहोत याचे भान आता साऱ्यांनीच जपण्याची गरज आहे. चार- पाच दिवसांपूव नगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अनुषंगाने बोलताना नगरचे खा. निलेश लंके यांनी नगरचा बिहार झाला असल्याचा आरोप केला. त्यांना नगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीमेत बिहार कसा दिसला हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र, एकाच जातीच्या- धर्माच्या लोकांची अतिक्रमणे काढली जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांचा असावा! मात्र, त्यांचा मूळ तालुका असणाऱ्या पारनेरमध्येही बिहार झाला आणि तेथील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन, त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या टोळ्याच काही गावांमध्ये मध्यंतरी जन्माला आल्या होत्या! या टोळ्या अन्‌‍ ते पोट्टे नक्की कोणाचे? त्यांना आश्रय कोण देते याबाबत झालेले आरोपही यानिमित्ताने चिंतनाचा विषय झाले आहेत. मुळात कायद्याचा धाक ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या पोलिसांनीही नि:पक्षपातीपणे काम करण्याची गरज आहे. अभयारण्यामध्ये प्राणी, पक्षी यांना सुरक्षीत वातावरण असते आणि त्यामुळेच त्यांची त्या अभयारण्यातील संख्या वाढत जाते! अगदी त्याच धतवर नगरमधील गुन्हेगारांचे झाले आहे काय! येथेही गुन्हेगारांना अपेक्षीत असेल अभयारण्य निर्माण झाले आहे! हे अभयारण्य नक्कीच राजाश्रीत आहे! हा राजाश्रय वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या किल्लेदारांचा आहे! हे किल्लेदार आधी ठेचून काढले पाहिजेत! ते ठेचायचे कोणी? पोलिस! छे छे त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणेच गैर आहे. सामान्य जनता! त्यांच्याकडून तर हे होणारच नाही! त्यांना छत्रपती हवे आहेत, पण शेजारच्या घरात!

मालकी सांगणाऱ्या टोळ्या जन्माला येत असल्याचा धोका ओळखा!
बीडमध्ये मस्साजोगच्या निमित्ताने जे झाले त्याहीपेक्षा जास्त भयंकर परिस्थिती नगरमध्ये आहे. तूर्तास ती शांत दिसत असली तरी त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. एका हिंदी मालिकेतील एका गुंडाचा डायलॉग परवा ऐकला! तो गुंड अगदी सहजपणे त्या शहराच्या आयुक्तांना सुनावत असतो! तो म्हणतो, ‌‘आप हमको घर की ओनरशिप समझा रहे हैं, हमें तो पूरा शहर लेना है‌’! नगरकरांनो, सध्या नगरमध्ये जे सुरू आहे ते यापेक्षा वेगळे नक्कीच नाही! पुर्ण शहरावर मालकी सांगण्याचे दिवस फार लांब आहेत असे नाही! हे वेळीच थांबले नाही तर पूर्ण शहर घेणाऱ्या अवलादी काही दिवसात दिसतील! त्यांच्या टोळ्या जगणं मुश्किल करतील! त्यांना आवर घालण्याचे एकमेव साधन म्हणजे मतदान! ते एकमेव साधन तर तुम्ही दोन- तीन हजार रुपयांत विकायला सरावले आहात! ज्यांनी या टोळ्यांना आवर घालायाचा, ती प्रशासनातील अधिकारी मंडळी दोन-तीन वर्षांचा टेन्युअर पूर्ण होताच बदली होऊन जातील! पण, तुमचे काय…? षंढपणातील ही जगणं किती दिवस जगणार आहात! तुमची पिढी गेली हो! पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी जरा पुढाकार घ्या! नाहीतर ती पिढी तुम्हाला नक्कीच माफ करणार नाही!

एसपी साहेब, हजारो कोटी लुटणारा संदीप थोरात मोकाट कसा काय हो?
वेगवेगळ्या नावाने बोगस कंपन्या स्थापून त्याच पतसंस्था असल्याचा भास निर्माण करत नगरसह नाशिक, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणारा संदीप थोरात हा तोतया आजही नगरच्या पोलिसांना सापडायला तयार नाही. गुन्हे शाखा तर या विषयावर ब्र शब्द बोलायला तयार नाही. बेरोजगारांना लुटण्याचा फंडा तयार करत आरोग्यदूत नियुक्तीच्या नावाखाली लाखो रुपये त्याच्या बँक खात्यात जमा करुन घेणार हाच संदीप थोरात! गंडविण्याचा वेगवेगळ्या युक्त्या आखत असताना आणि त्याची अंमलबजावणी करत असताना पोलिस त्याच्या विरोधात काहीच कारवाई करत नाहीत याचाच अर्थ दाल मे कुछ तो काला है! त्याच्याकडून वाटा दिला जातोय आणि हा वाटा कोणाकोणाला दिला जातोय याची जाहीर चर्चाही झडू लागली आहे. एसपी साहेब, तुम्ही त्याच्या पापाचे वाटेकरी नक्कीच नसाल! मग, तरीही संदीप थोरातच्या मुसक्या तुमचे पोलिस का आवळत नाहीत या प्रश्नाचे उत्तर नगरकरांना मिळण्याची गरज आहे.

केलेली पापे सुरक्षितपणे दडवायची अन्‌‍ ती पापे पचवून प्रतिष्ठेचा ढेकर देणारे दुष्टचक्र थांबवा!

राजाश्रीत गुंडगिरी मोडून काढण्याचे काम पोलिसांच्या काठीने होईल अशी अपेक्षा ठेवणेही आता चुकीचे झाले आहे. मुळात पोलिसांवरच गुंडांचा धाक निर्माण झाल्यासारखी परिस्थिती असल्याचे बीडमधील घटनेने अधोरेखीत केले आहे. खरे तर राजकारणाचा अतिरेक हे याचे प्रामाणिक उत्तर. आणि राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण, हे ओघाने आलेच. हे सत्ताकारण का करायचे? कारण विकास हवा. विकास म्हणजे काय? तर आपल्या आसमंतातील जमिनी वाटेल तशा लुबाडण्याचा, लुबाडलेल्या जमिनींवर वाटेल तशी बांधकामे करण्याचा, वाटेल तशा बांधकामांतून वाटेल तशी नामी/ बेनामी संपत्ती निर्माण करण्याचा सुलभ आणि सुरक्षित मार्ग. असे हे दुष्टचक्र. ते एवढ्यावर थांबत नाही. सत्ताकारण केले की वाटेल ती पापे अत्यंत सुरक्षितपणे दडवता येतात आणि ती पचवून प्रतिष्ठेचा ढेकरही देता येतो, ही सोय आहेच. ती फक्त सत्ताधाऱ्यांनाच असल्याने प्रत्येकास विकासासाठी सत्तेची सुरक्षित ऊब हवी. हे सर्व याआधी नव्हते असे नाही. पण इतके दिवस हे सारे सामान्यांच्या जगण्यावर उठलेले नव्हते आणि जनसामान्यांस त्याची धग लागत नव्हती. तथापि कालाच्या ओघात या राजकारण्यांची संख्या इतकी वाढली की त्यांचे राजकारण आता जनसामान्यांच्या जगण्याचा सहज संकोच करू लागले आहे.

सुखवस्तू सावेडीचा बीड होऊ लागलाय!
नगर शहराच्या मध्यवत भागात कमीअधिक प्रमाणात गुंडगिरी आहे मान्य करतानाच सुखवस्तू समजल्या जाणाऱ्या सावेडी उपनगराचा बीड होऊ पाहत असल्याचे वास्तव मान्यच करावे लागणार आहे. शहरातील राजकारण्यांना त्यांच्या उद्याच्या महापालिका निवडणुकीचे पडले आहे. आपण आणि आपला प्रभाग या पलिकडे पाहण्यास त्यांना वेळ नाही. ज्यांना वेळ आहे त्यांना भलतेच पडले आहे. सावेडी उपनगरात गुंडगिरी फक्त वाढलीच नाही तर ती फोफावली देखील आहे. दोन वर्षापूव याच उपनगरात दिवसा मुडदे पडले! मारेकरी आत गेले असले तरी नव्याने टोळ्या तयार झाल्या आहेत आणि त्यांची ताबेमारी देखील!

नगरच्या एमआयडीसीत गुन्हेगारी का वाढली?
नगरच्या एमआयडीसीमध्ये उद्योजकांना धमकावले जाते आणि त्यांना त्रास दिला जातोय. त्यांना संरक्षण देण्याची मागणी करणारे शिष्टमंडळ पोलिस अधीक्षकांना भेटले. आ. संग्राम जगताप यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. याचाच अर्थ नगरच्या एमआयडीसीमध्ये गुंडागिरी, दहशत वाढली हे मान्यच करावे लागेल. शहराचे आमदार जर याबाबत मागणी करत असतील आणि पोलिस ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पुढाकार न घेता ढिम्म बसून बघ्याची भूमिका घेत असतील तर खाकी वद हप्तेखोरीने बरबटली असल्याच्या चर्चेला बळ मिळते. मुळात या विषयावर आता आमदारच बोलले असल्याने पोलिसांनी खमकी भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र, ते तसे करताना दिसत नाहीत! त्यांचे हात कोणी बांधले आहेत का असा थेट सवालच यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

चौकाचौकातील सीसीटीव्ही कुठे गेले?
नगरची वाटचाल कायदाशून्यतेकडे सुरू असल्याच्या शंकांना बळकटी मिळेल अशा घटना अलिकडे घडल्या आहेत. पुण्यात स्वारगेटची घटना घडली. त्यातील आरोपी पकडण्याआधीच त्याला फाशीची मागणी करण्यात आली. आरोपी सापडण्याआधीच अशी मागणी! नगर शहरात सीसीटीव्ही बसवले आहेत! त्याचा मोठा गाजावाजा करत लोकार्पणाचा कार्यक्रम झाला! पुढे काय? चौकाचौकात सीसीटीव्ही असतील तर मग त्याचा प्रभावी वापर होतोय का? असा प्रश्न निर्माण होतोच!

गैरउद्योगी भणंग तरुण पदरी बाळगणाऱ्या राजकारण्यांच्या लवण्या हाणण्याची गरज!
पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी राजकीय कार्यकर्ता असल्याचे बोलले जाते आणि त्याच्याविरोधात आणखीही काही गुन्हे असल्याचे दिसते. वास्तव तसे असल्यास अजिबात आश्चर्य नाही. कारण अलीकडे ‌‘राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा‌’ हे सत्य पूर्णपणे बदलले असून राजकारणी हे बदमाशांचे पहिले आश्रयस्थान झालेले आहे. राज्याचा कोणताही भाग यास अपवाद नाही. नगर तर नाहीच नाही! वाटेल ते गुन्हे करून बिनबोभाट सन्मानाने जगता यावे म्हणून राजकीय आश्रय घ्यायचा आणि या अशा गुन्हेगारांच्या फौजाच्या फौजा सुरक्षितपणे पोसता याव्यात यासाठी राजकारण्यांनी कायम सत्तासावलीत राहायचे, हे आपले वास्तव. सत्तेतून गैरमार्गाने अधिकाधिक पैसा करायचा, तो करण्यासाठी वाटेल ते गैरउद्याोग करण्यास तयार असणारे भणंग तरुण पदरी बाळगायचे आणि हे सर्व अबाधित राहावे म्हणून जिकडे सत्ता तिकडे आश्रय मिळवत राहायचे हे सध्याचे नगरचे राजकारण. यातील धोका ओळखण्याची गरज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस...

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...