मुंबई | नगर सहयाद्री ;-
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतंर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येते. जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर, ऑगस्टच्या सुरुवातीला जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता महिलांच्या मनात ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत उत्सुकता आहे.
सूत्रांनुसार, ऑगस्टचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत कधीही जमा केला जाऊ शकतो. याआधीही योजनेतील हप्ते शेवटच्या आठवड्यांतच दिले गेले आहेत. त्यामुळे २३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. यंदा गणेशोत्सवाचा प्रारंभ २८ ऑगस्टपासून होत असल्याने, सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांना हप्ता लवकर मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील हप्ते अनेकदा सण-उत्सवांच्या आधी दिले गेले आहेत.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले असून, संबंधित महिलांना योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही. अर्जाची तपासणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जात असून, लाभार्थी महिलांनी सर्व निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. राज्य सरकारकडून लवकरच अधिकृत तारीख जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. तोपर्यंत महिलांनी अधिकृत वेबसाइटवर किंवा स्थानिक प्रशासनाकडून खात्री करून घ्यावी.