मुंबई / नगर सह्याद्री –
महायुतीने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना योजनेतून महिना २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र, महायुती सत्तेवर आल्यानंतरही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असल्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी महिना २१०० रुपयांच्या प्रतिक्षेत आहेत. लाडक्या बहिणींना महिना २१०० कधी मिळणार, याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाला भेट दिली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. लाडक्या बहिणींच्या हप्त्याविषयी भाष्य करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘लाडकी बहीण योजना १५०० रुपयांनी सुरु केली. आता २१०० रुपये दिले जाणार हे आमचेच आश्वासन आहे. आम्ही जे बोललो, ते बोललो पूर्ण करणार आहोत’.
कर्जमाफीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणारं आमचं सरकार आहे. जाहिरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार आहोत. आम्ही जाहिरनाम्यात प्रिंट मिस्टेक म्हणणार नाही. आर्थिक परिस्तिथी संभाळून सर्व मागण्या पूर्ण करणार आहोत’.
‘आम्ही वीज बिलमाफीची घोषणा केली. सरकार आल्यावर शेतकऱ्यांना वीजबिले पाठवली. आम्ही जो शब्द दिला तो पार पाडणार आहोत. राज्याची आर्थिक स्थिती संभाळून कसरत करुन योजना सुरु ठेवणार आहोत, असे शिंदेंनी सांगितलं.
छत्रपती संभाजी महाराजांवर भाष्य करताना म्हटलं की, ‘छत्रपती संभाजी शौर्याचे प्रतिक आहे. स्मारक तिर्थक्षेत्र व्हावं, यासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी दिला. गडकोट किल्याचे संवर्धन करणं आमचं काम आहे. गडावरील अतिक्रमण मुक्त करणार आहे. औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारेही कलंक आहेत’.