Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस असं वातावरण दिसून येतंय. अनेक शहरांमधील तापमान ४२ अंशापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता असून ५ एप्रिलपासून राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान असून राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभगाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर ५ ते ८ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त तापमान असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 एप्रिल दरम्यान आंध्र प्रदेश झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमाच्या काही भागामध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.