Ladki Bahin Yojana: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरूवात झाली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. पण महिल्यांच्या खात्यात १५०० रूपये जमा झाले, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? याबाबत चर्चेला उधाण सुरू झाले. सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांकडून कऱण्यात आला, आता महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबात महत्त्वाची माहिती दिली. खात्यात पैसे कधी जमा होतील, याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या हप्त्यांचे एकत्र वाटप करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. शुक्रवारपासून या हप्त्यांचे वाटप सुरू झाल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी ५२ लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत १५०० रुपये जमा करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी ट्वीट करत मार्च महिन्याच्या हप्त्याविषयी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला २,१०० रुपये देण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले होते. या आश्वासनांची आम्ही पूर्तता करणार आहोत, यात कोणतीही शंका नाही. २१०० रुपयांबाबत नियोजन सुरू आहे, आमच्या घोषणेचे नक्कीच पालन करू, असे त्यांनी स्पष्ट केले.