Maharashtra Local Bodies Election : कधी कोराेनाचे कारण देत तर कधी ओबीसी आरक्षणाचे कारण देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी प्रकरणाच्या सुनावणीमध्ये’ तारीख पे तारीख’ असं चित्र समोर येत आहे. राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवरील लोकप्रतिनिधींची मुदत संपली आहे. सध्या या महत्त्वाच्या संस्थांवर प्रशासक राजवट आहे.
आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सुनावणी लांबणीवर गेली आहे. या सुनावणीची नवी तारीख समोर आली आहे. स्वराज्य संस्थाच्या प्रकरणाची सुनावणी १६ एप्रिलला होणार होती. मात्र आता ही सुनावणी थेट १२ जुलैला होण्याची शक्यता आहे.
सुनावणीसाठी ‘तारीख पे तारीख’
आतापर्यंत २८ नोव्हेंबर २०२३, ९ जानेवारी २०२४, ४ मार्च २०२४ आणि १६ एप्रिल २०२४ या तारखा सुनावणीसाठी देण्यात आलेल्या होत्या. या प्रकरणाची शेवटची सुनावणी १ ऑगस्ट २०२३ ला झाली आहे. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयात तारीख देऊनही सुनावणी झालेली नाही.
महाराष्ट्रातील जनतेचं लागले लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अंधारात आहे. या प्रकरणात वारंवार सुनावणी पुढं जात असल्याने या सुनावणीकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात लांबणीवर पडल्या असल्याचं चित्र आहे.