मुंबई । नगर सहयाद्री:-
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत. तसेच या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत महत्वाची माहिती दिली.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीविषयी भाष्य केलं. दिनेश वाघमारे म्हणाले, ‘निवडणूक टप्प्याटप्प्याने होणार आहे. 1 जुलै 2025 नुसार मतदार यादी आहे, त्या परवानगीनुसार मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. आता प्रारूप प्रभाग रचनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
‘सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार काम केले जाते. ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचे काम थोडे सोपे झाले आहे. मागील निवडणुकीतही ओबीसी आरक्षण होते. एससी एसटी आरक्षण हे ठरलेलं असतं. परंतु ओबीसी आरक्षण हे लॉटरी पद्धतीने काढले जाणार आहे, असे त्यांनी सांगितलं.
‘दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर अखेर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकसाठी व्हीव्हीपॅट मशीन राहणार नाही, असे आयुक्त वाघमारे यांनी सांगितलं.