अहिल्यानगर | नगर सह्याद्री
दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पीडित अल्पवयींनचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
3 जुलै रोजी रात्री 12 वाजता ते 4 जुलै रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सारसनगर परिसरातून अज्ञात व्यक्तीने एका 17 वषय मुलाचे त्याच्या पालकांच्या देखरेखीतील कायदेशीर रखवालीतून अपहरण केले. पीडित मुलाच्या पालकाने यासंदर्भात 5 जुलै रोजी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून मुलाचा शोध सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. 3 जुलै रोजी रात्री 11.30 वाजता ते 4 जुलै सकाळी 6 वाजेदरम्यान ही घटना घडली. अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिची अल्पवयीन मुलीचे (वय 16) अज्ञात इसमाने अपहरण केले. मुलगी घरासमोर असताना कोणीतरी तिला फुसवून नेल्याची शंका असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 5 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.