राहाता । नगर सहयाद्री:-
राहाता तालुक्यातील कोल्हार गावात एका पोलीस हवालदाराने दुकान बंद करण्याच्या नावाखाली दुकान चालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल गोरे यांना देखील पोलिसांकडून बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
दुकान बंदीचा निर्णय काही दिवसांपूर्वी कोल्हार गावात घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार रात्री १० वाजता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता केक शॉप चालवणारे कैलास पिलगर हे दुकान बंद करत असताना सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या एका पोलीस हवालदाराने त्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेविरोधात तक्रार करण्यासाठी पिलगर पोलीस ठाण्यात गेले असता त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या शितल गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोणी पोलीस ठाणे गाठले. मात्र, तिथेच त्यांना अरेरावी करत पोलिसांनी मारहाण केली आणि चार तास पोलीस ठाण्यातच डांबून ठेवले, असा गंभीर आरोप शितल गोरे यांनी केला आहे.
याप्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास “मुलासह तुला जिवे मारून टाकू” अशी धमकी पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे नेते जितेंद्र भावे यांनी या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलीस हवालदार आणि अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुकानदाराला मारहाणीच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या प्रकारांमुळे कायद्याचे रक्षकच कायदा हातात घेत गुंडगिरी करत आहेत का? असा संतप्त प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.