अहिल्यानगर । नगर सह्यद्री:-
मध्य शहरात आस्थापनांच्या जाहिरातींसाठी, तसेच सण उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फलक लावले जात आहेत. महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेतली असून मध्यवर्ती शहरात अनधिकृतपणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता लावलेल्या तीन फलकांवर कारवाई केली आहे. फलक लावणाऱ्या तिघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनापरवाना फ्लेक्स, इतर फलक लावणाऱ्यांवर यापुढे दंडात्मक व फौजदारी अशा दोन्ही स्वरूपाच्या कारवाया केल्या जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.
शहरात फ्लेक्स, फलक लावण्यापूर्वी महानगरपालिकेची रीतसर परवानगी घ्यावी, असे आवाहन यापूर्वी वेळोवेळी महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. अनधिकृत फ्लेक्स, पोस्टर, फलक लावणाऱ्यांवर महानगरपालिकेकडून गुन्हेही दाखल करण्यात आले होते. आता महानगरपालिकेने पुन्हा कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. प्रभाग अधिकाऱ्यांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या शहर प्रभाग समिती कार्यालयाचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी रविवारी तिघांविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिल्ली गेट वेस येथे नारळी पौर्णिमा व रक्षा बंधननिमित्त शुभेच्छा देण्यासाठी श्री ज्वेलर्सचे श्रीकांत रमेश मंडाल, बेलेश्वर मंडप लाईट व साऊंड डेकोरेटर्सचे अंबादास गोटीपामूल व वारुळाचा मारुती रोड चौक येथे एकदंत ग्रुप, शिवराज्यकर्ते युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे ऋषिकेश भाऊ सामल या नावाचे विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावण्यात आल्याचे आढळून आल्याने शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.