अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
एमआयडीसी जवळील निंबळक बायपास रस्त्यावर एका नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मागील महिन्यात शहरातून बेपत्ता झालेल्या एका व्यापाऱ्याचा हा मृतदेह असल्याची चर्चा शहरात सुरू असून पोलिस प्रशासन त्या दृष्टीने तपास करत आहेत.
मागील महिन्यात शहरातील एक व्यापारी बेपत्ता झाल्याची नोंद तोफखाना पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. सोमवारी या प्रकरणाशी संबंधित संशयित असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर निंबळक शिवारात बायपास रस्त्यावर नालीमध्ये मृतदेह आढळून आला आहे.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा हा मृतदेह असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पोलिसांनी मात्र याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.