अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात सोमवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जुन्या वादातून एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची घटना घडली. जखमी विद्यर्थ्यांच्या तक्रारीवरून दोन आरोपींसह इतरांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी विध्यार्थी न्यू आर्ट्स कॉलेज गेटसमोर थांबला होता. यावेळी अतिश उरमुडे (रा. रंगोली हॉटेलजवळ) आणि सार्थक ठोंबरे (रा. नेप्ती नाका) व त्यांचे इतर काही अनोळखी साथीदार तिथे आले. आरोपींनी विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. अतिश उरमुडे याने विद्यार्थ्याच्या डोक्यात मारले. त्यानंतर सार्थकने चाकू सारख्या धारदार शस्त्राने पाठीवर वार केला, तर अतिशने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
व्यापाऱ्याच्या मुलीला धमकी
अहिल्यानगर
शहरातील गंज बाजार परिसरातील एका व्यापाऱ्याच्या मुलीला अल्पवयीन मुलाने जीवे मारण्याची धमकी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ललित एजन्सीचे मालक असलेले फिर्यादी ललितकुमार परिख हे कुटुंबासह शहरात वास्तव्यास आहे. त्यांच्या बहिणीच्या घरी, जुना कापड बाजार रोडवर, त्यांची मुलगी काही दिवसांसाठी राहायला गेली होती. याचदरम्यान, फिर्यादी पती-पत्नी बाहेरगावी एका विवाह समारंभासाठी गेले होते. दरम्यान एका अनोळखी मुलाने घरात शिरून मुलीला, तू मला पैसे दे, नाहीतर मी तुझ्या वडिलांना ठार मारेन, अशी धमकी दिली. फिर्यादीच्या धाकट्या भावाला शेजाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. या माहितीनंतर तात्काळ फिर्यादीचे भाऊ आणि काही नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या अल्पवयीन मुलास पकडले. पकडलेला मुलगा १६ वर्षीय असून तो बारामती येथील रहिवासी आहे. मुलाला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
घराच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबोडी परिसरात घराच्या मालकीच्या वादातून एका कुटुंबावर चार जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी जयराम कचरु बेरड यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मिना राजेंद्र खोमणे, राजेंद्र सुर्यभान खोमणे, गोवर्धन मच्छिंद्र कराळे आणि परीगा मच्छिंद्र कराळे (सर्व रा. निंबोडी, जि. ता. अहिल्यानगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी आरोपींनी घरात अनाधिकाराने प्रवेश करून तक्रारदाराच्या भावाला ‘तू मला घर का देत नाही’ या कारणावरून शिवीगाळ केली. लाकडी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या साक्षीदारांनाही शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या मारहाणीत विकास बेरड जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ आर. एस. मिसाळ करत आहेत.



