अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पेमराज सारडा कॉलेजच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावत असताना एका विद्यार्थ्यावर चार अनोळखी इसमांनी अचानक हल्ला केल्याची घटना मंगळवार दि.19 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. कृष्णा विठ्ठल उमाप (वय 19, रा. सिद्धार्थनगर, करंदीकर हॉस्पिटलजवळ) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, या हल्ल्यात त्याच्या डाव्या हाताला व पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.
कृष्णा उमाप हा बारावीचा विद्यार्थी असून कॉलेजमध्ये येण्यासाठी मामाच्या नावावरील सुझुकी अॅक्सेस दुचाकी वापरत असतो. घटनेच्या दिवशी, तो कॉलेजला गेला असताना पार्किंगमध्ये काही तरुण गोंधळ घालत असल्याचे दिसले. मास्क परिधान केलेल्या तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी अचानक त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला आणि शिवीगाळ केली. त्यापैकी एकाने लोखंडी रॉडने हातावर आणि पाठीवर जबर मारहाण केली.
हल्लेखोरांनी आमच्या नादी लागलास तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आणि घटनास्थळावरून फरार झाले. जखमी अवस्थेत कृष्णा याने ही माहिती आपल्या वडिलांना दिली. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी संबंधित चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रेड फ्लेम कॅफेजवळ विद्यार्थ्यांवरधारदार शस्त्राने हल्ला
बोरुडे मळा येथील रेड फ्लेम कॅफेजवळ 18 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. पियुष मोनेष ढाके (वय 17, रा. बिशप वॉईड कॉलनी, सावेडी) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी पृथ्वीराज गायकवाड आणि विशाल (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियुष हा नगर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून घटनेच्या वेळी तो आपल्या मित्र अभिवचन ठोंबे याच्यासोबत रेड फ्लेम कॅफेजवळ गेले होते. अभिवचनला त्याच्या बहिणीचा फोन आल्यानंतर ते तेथे गेले असता, त्यांचा पृथ्वीराज आणि विशाल यांच्याशी वाद झाला.माझ्या बहिणीला त्रास का देता? असा जाब विचारताच संतप्त झालेल्या विशालने पियुषच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केला, तर पृथ्वीराजने अभिवचनला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पुन्हा नादी लागला तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे