Maharashtra Crime News: बीड जिल्ह्यात पवनचक्कीच्या वादातून घडलेल्या खूनाच्या घटनेचा धक्का अजून ताजा असतानाच धाराशिव जिल्ह्यातही पवनचक्की ठेकेदारांचा दहशत माजवण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पवनचक्की ठेकेदारांकडून तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगागावात रिन्यू कंपनीच्या पवनचक्की उभारणीसाठी गावकऱ्यांनी परवानगी नाकारली होती. त्यावर ठेकेदारांनी १५-२० काळ्या स्कॉर्पियो गाड्यांमधून ४०-५० बाऊन्सर्स गावात पाठवून गावकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.
गावात बाऊन्सर्सनी अरेरावीच्या सुरात धमकावून दोन तास गुंडागिरी केली. मात्र, वारंवार संपर्क साधूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. अखेर भाजपाचे स्थानिक पदाधिकारी विशाल रोचकारी यांच्या हस्तक्षेपाने हा प्रकार थांबवण्यात आला. गावकऱ्यांनी आरोप केला आहे की पवनचक्की ठेकेदार पोलिसांच्या मदतीने गावात दहशत निर्माण करून बळजबरीने पवनचक्क्या उभारत आहेत. यावर त्यांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना तक्रार केली आहे, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
पवनचक्की ठेकेदाराच्या या दहशतीने गावकरी मात्र पूर्ण धास्तावलेले पाहायला मिळाले. या घटनेमुळे गावात प्रचंड भीतीचं वातावरण आहे. ठेकेदार आणि बाऊन्सर्सच्या दहशतीने गावकरी घाबरले आहेत. प्रशासनाने या गुंडगिरीवर तत्काळ कारवाई करावी आणि दोषींवर कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. बीडनंतर धाराशिव जिल्ह्यातही अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.