अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
पूर्ववैमनस्यातून तीन मित्रांवर लाकडी दांडके, तलवारीने हल्ला करून त्यांना जखमी केले. दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली. अश्विन संजय खुडे, सुधीर राजू मिसाळ व अजय विजय भोसले (रा. रामवाडी, अहिल्यानगर) अशी जखमी मित्रांची नावे आहेत. रविवारी (15 डिसेंबर) रात्री 10:20 वाजेच्या सुमारास रामवाडी परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी जखमी अश्विन खुडे यांच्या फिर्यादीवरून सुरज जाधव, अजय सासवडकर, शुभम गंगेकर, जय लोटके, समर्थ ढेरेकर (पूर्ण नावे नाही, सर्व रा. तोफखाना) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत रामवाडी येथील रस्त्यावर बसलेले असताना सुरज जाधव याने फिर्यादीला फोन करून शिवीगाळ करत हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. काही वेळातच सुरज जाधव व इतर तेथे आले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून फिर्यादी व त्यांच्या दोन मित्रांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. तलवारीने हल्ला करून जखमी केले.
फिर्यादी व त्यांचे मित्र घटनास्थळावरून पळून जात असताना त्यांनी त्यांच्या दिशेने दगडफेक केली. दगडफेकीत दुचाकी, रिक्षाचे नुकसान झाले. तु जर आम्हाला परत भेटला तर तुला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.