मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. ११ दिवसांच्या बाप्पाचे मंगळवारी विसर्जन होणार आहे. त्याचसोबत सोमवारी ईद-ए मिलाद सण आहे. त्यामुळे सोमवारी शासकीय सुट्टी आहे. परंतु मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने ईदची सुट्टी १८ सप्टेंबरला देण्यात आली आहे.
ईद-ए मिलाद हा मुस्लिम धार्मियांचा सण आहे. यावेळी जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या उद्देशाने ईद ए मिलादची सुट्टी बुधवारी देण्यात आली आहे.मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये बुधवार जुलूस कार्यक्रम करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवानी घेतला आहे. त्यामुळे ईदची सुट्टी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर याव्यतिरिक्त राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, असा निर्णय घ्यावा, असं प्रशासन विभागाने कळवले आहे. त्यामुळे आता ईद ए मिलादची सुट्टी बुधवारी मिळणार आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना लाँग वीकेंड मिळणार आहे. अनंत चतुर्दशी आणि ईदची सुट्टी लागोपाठ आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सलग सुट्टी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुस्लीम आणि हिंदू बांधवांमध्ये सलोखा राहावा, यामुळे हा निर्णय घेतला आहे.