अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
केडगाव येथील शिवाजीनगर परिसरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत एका तरुणाला मारहाण करण्यात आली. ऋषीकेश सुनील गोरे (वय 30 रा. शिवाजीनगर, केडगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (1 मार्च) सायंकाळी 7 वाजता घडली. जखमी तरूणाला प्रथम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
उपचारादरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून मारहाण करणार्या बाप-लेकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी आठरे, लालु आठरे (पूर्ण नावे माहिती नाही, रा. जगदंबा मोटर्स शेजारी, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश गोरे हे त्यांचा मित्र विशाल रोहेकले यांच्यासोबत जगदंबा मोटर्स शेजारील रसवंती गृहात रस पिण्यासाठी गेले होते. रस पिल्यानंतर त्यांनी दुकानदार रवी आठरे याला 50 रूपये दिले. मात्र, दुकानदाराने आणखी 10 रुपये मागितले.
त्यावर ऋषीकेश यांनी इतर ठिकाणी रस 20 रुपयांना मिळतो, तुमच्याकडे 30 रुपये कसा ? अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी रवी आठरे याने शिवीगाळ करत ऋषीकेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी रवी आठरे यांचा मुलगा लालू आठरे हा देखील भांडणात सहभागी झाला. त्याने रस्त्यावर पडलेला लाकडी दांडका उचलून ऋषीकेश यांच्या कपाळावर मारला. त्यामुळे त्यांच्या कपाळातून रक्तस्राव सुरू झाला.
घटनेनंतर मित्र विशाल रोहेकले यांनी ऋषीकेश यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले. पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड अधिक तपास करीत आहेत.