शिर्डी ।नगर सहयाद्री:-
शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात, त्याच शिर्डी शहरात सध्या चाललय काय सध्या असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली. दोन साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असताना साईबाबांची शिर्डी पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने चर्चेत आली आहे. त्यामुळे गुन्हेगारी व दादागिरी करणार्यांचा थेट एन्काऊंटर करा व शिर्डी देवस्थानाच्या ठिकाणची दादागिरी, गुन्हेगारी कायमस्वरूपी मोडीत काढून दहशतमुक्त शिर्डी शहर निर्माण करा, अशी मागणी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली.
शिर्डी शहरातील अवैध धंदे व दादागिरी कायमची मोडीत काढून दहशत मुक्त शिर्डी शहर निर्माण करण्याकरिता शासनाने गुन्हेगार, गुंड प्रवृत्तीचे दादागिरी करणारे व अवैध धंद्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करुन शिर्डी शहर दहशतमुक्त करावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो त्याचेवर कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे. दोष नसताना दोन संस्थान कर्मचार्यांची हत्या झाली आहे. दुहेरी हत्याकांडातील मयत दोन्ही संस्थान कर्मचार्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. या दुहेरी हत्याकांडात मृत पावलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांचे कुटुंबातील एका व्यक्तीस साईबाबा संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी सामावून घ्यावे, तसे आदेश शासनाने देवस्थानला करावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.