अहमदनगर । नगर सहयाद्री:-
डाकसेवेद्वारे मागविलेले अमली पदार्थाचे (हेरॉईन) पार्सल श्रीरामपूर डाकघर कार्यालयात आले. पोलिस पथकाने सापळा लावुन पार्सल स्वीकारणाऱ्या एकास श्रीरामपुरातून ताब्यात घेतले. हे पार्सल कोणी पाठवले याचा शोध पोलिस आता घेत आहेत.
पुणे येथून टपाल सेवाद्वारे एक पार्सल श्रीरामपूर डाक कार्यालयात जाणार आहे. त्यामध्ये अमली पदार्थ असण्याची शक्यता आहे, अशी माहिती एनसीबी मुंबईच्या अतिरिक्त संचालकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिली. तसेच त्या पार्सलचा नंबरही कळवला. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश देण्यात आले.
पंचासह पोलिस पथक घेऊन ते श्रीरामपूर नेवासा रोडवरील मुख्य डाकघर कार्यालयात गेले. डाकघर प्रमुख सागर आढाव यांची भेट घेऊन टपाल सेवेद्वारे येणाऱ्या पार्सलची महिती दिली. संबंधित पार्सल हे शुक्रवारीच श्रीरामपूर डाक घर येथे आले होते. ते पार्सल विक्रांत राऊत ( पूर्णवादनगर वॉर्ड नं. ७, श्रीरामपूर ) यांना देण्यासाठी पोस्टमन सपना प्रशांत माळवे यांच्याकडे देण्यात आले.
पोलिसांनी आलेल्या पार्सलची तपासणी केली. आरोपी राऊतची अंग झडती घेतली. त्यांनी ताब्यात घेतलेल्या पार्सलवर लिहिलेला पत्ता पाहिला पार्सलवर पाठविणाऱ्याचे नाव, पत्ता : दीपक दास (रा. निलाय अपार्टमेंट, फ्लॅट नं. ४, पलटन बाजार, बस स्टॅण्ड जवळ ) असे होते. पोलिसांना पार्सलमध्ये हेरॉईन आढळले. त्याची किंमत अंदाजे १२ हजार २०० रुपये आहे. हा पदार्थ नशेसाठी वापरला जातो. हेरॉईनसह आरोपी राऊत यांस ताब्यात घेतले.
अशी केली कारवाई
पोस्टमन सपना माळवे या पार्सल देण्यासाठी स्कूटरवरून दिलेल्या पत्त्यावर निघाल्या, त्यांच्या पाठीमागे पोलिस पथकातील कर्मचारी सापळा रचून गेले. पोष्टमन माळवे यांनी पार्सलधारकास मोबाइलवरून फोन केला. तेव्हा एक व्यक्ती आली. त्याने माळवेंकडून पोष्टाद्वारे आलेले पार्सल स्वीकारले. पार्सल स्वीकारणारी व्यक्ती आरोपी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच राऊत यास ताब्यात घेतले.