पुणे। नगर सहयाद्री-
पिंपरी चिंचवडमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी एक संतापजनक घटना गडल्याचे वृत्त समोर आले आहे. एका विवाहित महिलेचं भरदिवसा अपहरण करण्यात आलं असून दोन दिवस तिला वारंवार भुलीचं इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. कशीबशी तिनं स्वतःची सुटका केली अन् वाकड पोलीस स्टेशन गाठलं. अंगावर काटा आणणारा प्रताप महिलेच्या पतीनेचं केला होता. सुमित शहाणे असं या पतीचं नाव आहे.
अधिक माहिती अशी: पुण्याच्या मंचरमधील हे दाम्पत्य असून ऑगस्ट 2023 मध्ये या दोघांचं लग्न झालं. मात्र आठवडाभरात पती सुमितने नको त्या मागण्या सुरू केल्या, ज्या पत्नीला पचनी पडल्या नाहीत. मग तिने सुमितपासून लांबच राहणं पसंत केली. तिने थेट मुंबई गाठली, तिथं काही महिने ती मैत्रिणीकडे राहिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये आली. इथं एका बांधकाम व्यवसायिकाकडे काम सुरू केलं. याचा सुगावा सुमितला लागला अन् त्यानं पत्नीच्या ऑफिसचा पत्ता काढला.
19 जूनला सुमित आई आणि चालकासोबत वाकडमध्ये आला. दुपारी साडे तीनच्या सुमारास पत्नीला फरपटत गाडीत बसवलं. त्यावेळी पत्नीचा मित्र ही जबरदस्तीने गाडीत बसला. गाडी मंचरच्या दिशेने निघाली, थोडं पुढं गेल्यावर सुमितने पत्नीच्या मित्राला कानशिलात लगावली आणि गाडीतून बाहेर ढकलून दिलं. तिथून पुढचा प्रवास सुरु झाला. त्या प्रवासात सुमितने पत्नीला भुलीच इंजेक्शन दिलं. थेट घरी न जाता गाडीतच डांबून ठेवलं. या दरम्यान ती शुद्धीवर आली की तो वारंवार भुलीच इंजेक्शन द्यायचा, असा आरोप पत्नीने केलाय.