अहमदनगर | नगर सह्याद्री:-
मी कोतकरचा चुलत भाऊ आहे, तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? आम्ही तुमचे तुकडे करून तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी देत दुचाकीचा धक्का लागल्याचा बहाणा करून एका अनोळखी व्यक्तीने दोघा जणांकडून एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, साडेआठ हजाराची रोकड असा ३८ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटला.
या प्रकरणी सुर्यभान दौलतराव तामखडे (वय ६२ रा. गांजीभोयरे ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुर्यभान हे त्यांचे व्याही गंगाराम भिकाजी घोगरे यांच्यासोबत दुचाकीवरून नगरकडे रूग्णालयात येत असताना साडेदहाच्या सुमारास त्यांना केडगाव शिवारात औटी नर्सरीजवळ पाठीमागून आलेल्या एका अनोळखी दुचाकीस्वाराने अडविले.
तुमच्या गाडीचा माझ्या गाडीला धक्का लागला आहे असे म्हणून तुम्हाला गाडी चालविता येते का? तुम्ही कोठून आला, तुमच्याकडे आधार कार्ड, लायन्सन आहे का? सुर्यभान यांनी त्याला आधार कार्ड दाखविल्यानंतर तो त्यांना घेऊन काही अंतरावर गेला व त्याने मी कोतकरचा चुलत भाऊ आहे, तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? आम्ही तुमचे तुकडे करून तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी देत सुर्यभान व त्यांचे व्याही गंगाराम यांच्याकडील एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, साडेआठ हजाराची रोकड असा ३८ हजार ५०० रूपयांचा ऐवज काढून घेत निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.