अहमदनगर । नगर सहयाद्री
जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुक येथील बागमळा शिवारातील प्रवरा नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून अंत झाला आहे. तब्बल तीन तासांच्या अथक शोधकार्यानंतर मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. अविनाश पाराजी जोगदंड (वय १५), रा. निर्मलनगर, भगवतीपूर असे मयत शाळकरी मुलाचें नाव आहे.
अधिक माहिती अशी: बुधवार दि. २९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अविनाश जोगदंड, विश्वजीत बर्डे (रा. भगवतीपूर) आणि शुभम चौरसिया (रा. बागमळा) हे तिघे मित्र घरात कुणालाही काहीच न सांगता कोल्हार बटुक येथील बागमळा शिवारातील प्रवरा नदीपात्राकडे गेले.
अविनाश जोगदंड पाण्यात पोहण्यासाठी नदीत उतरला, अनधिकृत वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठमोठ्या आकाराचे खड्डे झालेले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अविनाश जोगदंड यात बुडाला. गटांगळ्या खाणाऱ्या अविनाशला पाहून त्याचे दोन मित्र घाबरले.
मित्राला वाचविण्यासाठी त्यांनी लगबगीने जाऊन आजूबाजूच्या लोकांना बोलावून आणले. स्थानिक रहिवाशी धावत घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत अविनाश पूर्णपणे पाण्यात बुडाला होता.चांगले पोहता येणाऱ्या गावातल्या स्थानिक तरुणांनी नदीपात्रात उतरून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. दुपारी दोन वाजता राहाता, शिर्डी, श्रीरामपूर येथून आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना अथक शोधकार्यानंतर दुपारी ४ वाजता मृतदेह मिळून आला.