अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला केंद्रप्रमुख शिक्षिकेची पदोन्नती रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून वर्ग खोली स्थलांतरित करताना कपाट व इतर साहित्य उचलून घेतल्याच्या प्रकारावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी संबंधित शिक्षिकेच्या पदोन्नतीला प्रक्रियात्मक त्रुटी, कागदपत्रांची अपूर्णता व वरिष्ठ अधिकाऱ्यांची संमती न घेता झालेली मानून ती रद्द केल्याचे आदेशात नमूद केले आहे. शिक्षिकेवर याआधीही पर्यवेक्षकीय कामात कसूर केल्याने २० मार्च २०२५ रोजी तात्पुरती एक वेतनवाढ रोखण्यात आली होती.
त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांना ४ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी ३ (वर्ग ३) या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. मात्र नियमानुसार शिक्षेच्या कालावधीत पदोन्नतीवर विचार होऊ शकत नाही. त्यामुळे सदर पदोन्नती रद्द करण्यात आली आहे. प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसल्याने व नियमांचे उल्लंघन झाल्याने ही पदोन्नती वैध मानता येणार नाही, असे आदेशात म्हटलं आहे.