अहमदनगर। नगर सहयाद्री
कोपरगांव बसस्थानकात बसलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी मोहसीन शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करत हात धरुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डिले, बाळासाहेब गुंजाळ व उमाकांत गावडे असे पथक नेमले. पथकाने आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती घेतली.
आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी मोहसिन शेख गांधीनगर (कोपरगांव) येथे आल्याचे समजले. पथकाने तेथे जात आरोपीचा शोध घेतला. एक संशयित तेथे आढळला. त्यास ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना तो पळून जावू लागला. पथकाने त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडे विचारपूस केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली.