पाथर्डी | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे वाटप अशा अनेक गोष्टींमुळे यंदाची निवडणूक गाजली. दरम्यान पाथर्डी च्या आमदार आणि भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्यात आली.
मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रकार सायंकाळी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील मतदान केंद्रावर झाला. तर आक्रमक जमावापासून बचाव व्हावा म्हणून राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदानकेंद्राच्या खोलीत कोंडून घेतले. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तास मतदानकेंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली.
तर या घटनेने संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील माणिक दौंडी चौकात रास्तारोको आंदोलन सुरु केले. यामुळे काही काळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेत राजळे आणि त्यांचे चार समर्थक किरकोळ जखमी झाले आहे.
शरीर जखमी झालं पण मुलांचे भविष्य उद्वस्त होता कामा नये
पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथे मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी आलेल्या आमदार मोनिकाताईंवर विरोधकांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्या किरकोळ जखमी झाल्या. मात्र, जखमांपेक्षा त्यांचं मातृत्व जिंकत राहिलं. पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. माझं शरीर जखमी झालं तरी हरकत नाही, पण या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होता कामा नये. तरूण मुलं चुकू शकतात, पण त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ नये, अशी मातृत्वभावनेतून त्यांनी भूमिका घेतली आणि तेथील तरुणांसाठी एक शिकवण ठेवली या प्रसंगाने आमदार राजळे यांच्या सहनशीलतेचा, माणुसकीचा आणि मोठेपणाचा प्रत्यय आणून दिला आहे. दगडफेक करणाऱ्या मुलांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांनी माणुसकीचं महान उदाहरण घालून दिलं. मोनिकाताईंच्या या निर्णयाने केवळ एक राजकीय नेत्याचा नव्हे, तर एका कुटुंबवत्सल मातेचा मोठेपणा झळाळून उठला.