मुंबई । नगर सहयाद्री:-
महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा रविवारी नागपूरमध्ये पार पडला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तसेच आणि अनेक दिग्गज मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यात छगन भुजबळ यांच्याही नावाचा समावेश आहे. याबाबत त्यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता ‘तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार वाटेल तेव्हा खाली आणणार, मी तुमच्या हातातल खेळणं वाटतो का? ‘असा संतप्त सवाल भुजबळांनी केला आहे. मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदापेक्षा पक्षातील नेत्यांकडून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केला.
भुजबळ म्हणाले की, “मला मंत्रिपद मिळाले की नाही, हा प्रश्न नाही. ज्याप्रकारे माझी अवहेलना करण्यात आली, त्याबद्दल मी नाराज आहे. बस बस उठ उठ असं सांगायला मी तसा नाही. मी आता माझ्या समर्थकांची भूमिका समजून घेत आहे. पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का? ते सांगतील तेव्हा बसायचं, त्यांनी सांगितल्यावर उठायचं,” असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
मोठा गौप्यस्फोट
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझा मंत्रिमंडळात प्रवेश व्हावा, यासाठी आग्रही होते. पण त्यानंतरही मला मंत्रिपद का मिळालं नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षात कोणाला मंत्रिपद द्यायचे, याचा निर्णय घेतात. आता मला कोणाच्या सांगण्यावरुन मंत्रीपद नाकारण्यात आले, हे शोधावे लागेल,” असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
लोकसभा, राज्यसभेलाही नाकारले
“उमेदवारी देताना मला वाट पाहावी लागली. मी लोकसभा, राज्यसभा मागितली होती, पण ती देखील मिळाली नाही. मला लोकसभेत जाण्याची इच्छा होती. पण महाराष्ट्राला माझी गरज असं सांगत विधानसभेसाठी उमेदवारी दिली. त्यानंतर मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी द्यायची आहे, असे सांगण्यात आले. तेव्हा देखील मी शांत बसलो.”
अजित पवार यांच्यावर आरोप
“मला माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे आहेत. मी आता लगेच राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभेवर जायचे असल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मी एक-दोन वर्षे थांबा, मी मतदारसंघात सगळं स्थिरस्थावर करुन राज्यसभेवर जातो, असे सांगितले होते. त्यानंतर आमचे नेते म्हणाले, यावर चर्चा करु, पण ते कधी चर्चेला बसले नाहीत,” असा थेट आरोप छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर केला.